परभणी : दिवाळीसाठी माहेरी जाणाऱ्या आईवर जीवघेणा हल्ला दोन गुंडानी केला. यात तिचे निधन झाले. जिल्हयातील पिंगळी रेल्वे स्थानकावर लूटमार करण्यासाठी आलेल्या दोन गुंडांनी दागिन्यांसाठी महिलेचा खून केला. या महिलेने गळ्यातील आपले दागिने न दिल्याने तिचा गळा चिरून त्यांनी खून केला. या घटनेमुळे एकच गोंधळ उडला. दरम्यान, रेल्वेप्रवासी आणि महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय.
दिवाळी सणासाठी आपल्या मोठ्या भावाबरोबर अकरा महिन्याच्या बाळासह घेऊन माहेरी परळीला जाणाऱ्या मातेचा दोन गुंडानी खून केला. दिवाळीच्या आधी रात्री नऊच्या सुमारास पिंगळी रेल्वे स्टेशनवर गाडी पोहोचली असता दोन चोरट्यांनी आरक्षित डब्यात अनधिकृत प्रवेश केल आणि प्रवाश्यांकडून पैसे उकळलेत. तसेच महिलांचे दागिनेही लुटण्यात आलेत.
सविता कापसे यांच्या बोगीत जास्त प्रवासी नसल्याने दोन गुंड धमकावून पैसे उकळत होते. सविताच्या हातातील मोबाईल आणि पर्स हिसकावून घेतली. त्यांची नजर सविताच्या दागिन्यावर गेली आणि त्यांनी ते दागिने घेण्याचा प्रयत्न केला सविता कापसे यांनी त्या गुंडांना दागिने देण्यास प्रतिकार केला असता. त्याचाच राग मनात धरून त्या गुंडांनी चाकूने सविताच्या मानेवर सपासप वार केलेत.
दरम्यान, रेल्वे स्थानकावर तिथे असलेल्या प्रत्यक्षदर्शी पैकी अनिल लोखंडे या युवकाने सविताच्या मदतीसाठी धाव घेतली. मात्र, चोरट्यांनी तेथून पळ काढला. चोरट्यांच्या हल्ल्यात सविता गंभीर जखमी झाल्यात. अनिलने त्या चोरट्यांचा पाठलाग केला. चोरटे अंधाराचा फायदा घेत फरार झाले. सविता या हिंगोली तहसील कार्यालयात नोकरी करत होत्या.
या आधीही पिंगळीस्टेशनवर लुटमार आणि दगडफेकीच्या घटना घडल्यात. मात्र, रेल्वे पोलिसांकडून नेहमीच दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप प्रवाशांनी केलाय. परभणी-नांदेड दरम्यान पिंगळी स्टेशन आहे. येथे झाडी असून स्टेशनपासून जवळ हायवे आहे. मात्र, रात्रीच्या वेळी निर्मनुष्य परिसर यामुळे गुन्हेगारांचे फावते, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.
दरम्यान, पूर्णा अकोला लोकल कळ्मनुरी तालुक्यातील नांदापूर रेल्वे स्थानकावर काही महिन्यापूर्वी लुटली होती. त्यामध्ये २३ लोक गंभीर जखमी झाले होते. अशा वारंवार घटना घडत असताना रेल्वे पोलीस दुर्लक्ष करीत असल्याने अशा घटनांत वाढ झाल्याचा आरोप प्रवासी आणि स्थानिकांनी केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.