पुणे : कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या तुकाराम मुंढे यांच्या हाती पुण्यातील पीएमपीची सूत्र येताच पीएमपी पुन्हा चर्चेत आली आहे. मुंढे यांनी पहिल्या दिवसापासूनच सुरु केलेल्या धडक मोहिमेमुळं पुणेकर प्रवाश्यांच्या पीएमपी बाबतच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील एकमेव सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पीएमपीची दशा आणि दिशा जाणून घेण्याचा हा प्रयत्न.
दिवस पहिला - कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांनी रोज ७ ऐवजी ८ तास काम करण्याचे आदेश
दिवस दुसरा - कामावर उशिरा आलेल्या ११७ कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कापला
दिवस तिसरा - सूचना देऊनही कामावर उशिरा आलेल्या ५ कर्मचाऱ्यांचं निलंबन
दिवस चौथा - रात्रपाळीच्या दरम्यान डुलकी घेणाऱ्या ९ कर्मचाऱ्यांचं निलंबन
याशिवाय १०० नादुरुस्त बसेस १५ दिवसांच्या आत रस्त्यावर आणणं, ब्रेक डाऊनची संख्या कमी करणं, कंत्राटी बसेसचा वापर नियंत्रित ठेवणं, बसेस स्वच्छ तसेच नीटनेटक्या ठेवणं, कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांनी नीटनेटकं राहणं
ही यादी बरीच मोठी आहे. नवी मुंबईतून मुदतपूर्व बदली झालेल्या तुकाराम मुंडे यांची पीएमपीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचा हा इफेक्ट आहे. हे सगळं करावं लागतंय यामागे अनेक कारणं आहेत. पुण्यातील पीएमपी ही आजघडीला एक मोडकळीस आलेली व्यवस्था आहे. पुणेकर प्रवाशांना जेव्हा पाहिजे तेव्हा आणि जिथे पाहिजे तिथे बस मिळणं नेहमीसाठी दुरपास्त ठरतं.
शहराची लोकसंख्या लक्षात घेता पीएमपीच्या ताफ्यात सुमारे ३ हजार बसेसची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात ताफ्यामध्ये २१०० बसेस आहेत, आणि त्यापैकी बारा - तेराशेच बसेस रस्त्यावर धावतात. उर्वरित बसेस कायम नादुरुस्त असतात. बसेसची अवस्था तर सांगता सोय नाही.
चालक - वाहकांचं वर्तन हा देखील तितकाच गंभीर विषय आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणजे अलीकडच्या काळात पीएमपीच्या प्रवासी संख्येत तसेच उत्पन्नात मोठी घट झालीय. शहरातील वाहतूक समस्या गंभीर असूनही ''पीएमपी म्हणजे नको रे बाबा'' अशी प्रवाश्यांची मानसिकता झालीय. या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढेंच्या रूपानं पुणेकरांना एक आशेचा किरण गवसलाय. पीएमपीमध्ये सुधारणा घडवण्यासाठी मुंढेंच्या कार्यपद्धतीचं स्वागत करतानाच, ५ रुपयांत बस प्रवास , प्रवाश्यांसाठी हेल्पलाईन, बसेसवर डिजिटल बोर्ड, पट्ट्यांची आखणी, प्रवाश्यांचा सहभाग असा पाच कलमी कार्यक्रम पीएमपी प्रवासी मंचाकडून सुचवण्यात आला आहे.
पीएमपीचे कर्मचारी तसेच अधिकारी पीएमपीचा कणा आहेत. आज पीएमपीमध्ये सुमारे ११ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्याही काही समस्या आहेत. कामात शिस्त आणतानाच कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.
प्रश्न प्रवाशांचे असो वा कर्मचाऱ्यांचे ते वेळीच सुटले नाहीत म्हणून पीएमपीची आज ही दुरावस्था झाली. आज दिवसाकाठी साडेदहा लाख प्रवासी पीएमपीनं प्रवास करतात. हा आकडा वाढल्यास पुण्यातील वाहतूक समस्येला मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे. बीआरटीची सक्षमपणे अंमलबजावणी असो वा चालक वाहकांची कर्तव्यनिष्ठा अशा अनेक बाबींतून ते साधलं जाणार आहे. आता तुकाराम मुंढेंच्या हाती पीएमपीच स्टिअरिंग आलंय. ८ वर्षांत १४ अध्यक्ष हा पीएमपीचा इतिहास राहिलेला आहे. त्यामुळे सरकारला पीएमपीबद्दल किती तळमळ आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. अशा परिस्थितीत मुंढेंच्या मार्गात नाहकचे गतिरोधक उभारले जाऊ नयेत म्हणजे झालं. अन्यथा वयाची पंच्याहत्तरी पार केलेल्या पीएमपीचा अकाली घात झाल्यास आश्चर्य वाटू नये.