जळगाव : अमळनेर शहरात तहसिल कार्यालयासमोर मागील सहा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. मात्र प्रशासनाची कोणतीही सूत्र हलत नाहीत. याबाबतीत तहसिलदारांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवला आहे, मात्र जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची कारवाई ढिम्म असल्याचं सांगण्यात येतंय, यामुळे उपोषणकर्ते नाहक ताटकळले असल्याची चर्चा आहे. उपोषणकर्त्यांना अशक्तपणा जाणवत असल्याचं सांगण्यात येतंय.
हे उपोषण दोन रेशनिंग दुकानदारांविरोधात कारवाईच्या मागणीसाठी आहे. आपल्याकडे रेशनिंगमध्ये गैरव्यवहार झाल्याचे पुरावे आहेत, असा दावा श्यामकांत जयवंतराव पाटील यांनी केला आहे, यासाठी मागील ६ दिवसांपासून ते आमरण उपोषणावर आहेत.
सहा दिवसानंतरही प्रशासन म्हणतंय वेळ द्या...
याविषयी अमळनेरचे तहसिलदार अमोल निकम यांच्याकडून माहिती घेतली असता, रेशनिंग दुकानदारांची दफ्तरं ही तहसिल कार्यालयात जमा आहेत. मात्र चौकशीसाठी गेलो असतांना हे दोन्ही दुकानदार गैरहजर होते, आम्हाला चौकशीसाठी आणखी वेळ द्यावा अशी मागणी आम्ही उपोषणकर्त्यांकडे करतोय.
पुरावे आहेत, गु्न्हा दाखल करा - उपोषणकर्ते
मात्र आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा श्यामकांत जयवंतराव पाटील यांनी केला आहे, या पुराव्यांनुसार कारवाई व्हावी, संबंधित दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, गुन्हे दाखल केले, तरच आपण उपोषण सोडू, यावर उपोषणकर्ते ठाम आहेत.
प्रशासनाला आम्ही उपोषणाचं पत्र दिलं होतं, त्याचवेळी त्यांनी चौकशी का केली नाही, त्यांना पुरेसा वेळ होता, तरीही चौकशीसाठी प्रशासनाने दिरंगाई का केली?, असा सवाल उपोषणकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.
वेळेत चौकशी न करणे ही कुणाची चूक
दहिवद गावामधील रेशनिंग दुकानदारांविरोधात आलेल्या तक्रारींची वेळेत चौकशी झाली असती, तर उपोषणाची वेळ आली नसती असं उपोषणकर्त्यांनी म्हटलं आहे. तहसिलदार अमोल निकम हे आता आले आहेत, त्याआधी सध्याच्या नायब तहसिलदार रूपाली काळे यांच्याकडे तहसिलदारांचा प्रभारी पदभार होता, त्यांनी वेळीच चौकशी केली नाही, ही प्रशासनाची चूक आहे, अजूनही वेळ गेलेली नाही, मागील सहा दिवसात एकच दिवस चौकशी करण्यात आली, त्यालाही दुकानदार हजर नव्हते, आम्ही आणखी काही दिवस उपोषण सुरू ठेऊ, वाट पाहू पण कारवाई झाली पाहिजे अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.