शिर्डी : साईंच्या शिर्डीतही यावर्षी दुष्काळाची झळ पोहचतेय. संस्थानन 32 लाख लिटरचे 3 तलाव बांधलेत. पण कमी पावसामुळं गोदेवरच्या गंगापूर धरणात पाणीच नाही आहे. साईबाबा संस्थानसह ७ नगरपालिकांना पाण्याचं आवर्तन 5 जूनला येणार होतं. धरणात पाणी नाही आणि मान्सूनही लांबला. त्यामुळं 5 जूनचं आवर्तन आलंच नाही.
साई संस्थानला दिवसाकाठी 40 लाख लिटर पाण्याची गरज असते. पण तळ्यात पाण्याचा थेंबही नसल्यानं संस्थानात रोज टँकर मागवावे लागतायत. रोज 150 टँकरद्वारे संस्थानमध्ये पाणी आणलं जातं. पाणी नसल्यानं संस्थाननं 50 टक्के खोल्या बंद केल्यात. त्यामुळं भक्तांना खासगी हॉटेलमध्ये रहावं लागतं. हॉटेलमध्येही पाणी विकत घ्यावं लागत असल्यानं हॉटेल व्यावसायिक याचा बोजा ग्राहकांवर टाकतात. थोडक्यात शिर्डीतल्या पाणीटंचाईचा फटका बाहेरून येणा-या पर्यटकांना बसतोय.
पाणी बचतीसाठी प्रसादालयात ताटांऐवजी पत्रावळी वापरल्या जातायत. संस्थानला निळवंडे धरणातून थेट पाईपलाईनद्वारे पाणी पुरवण्याची योजना आखली जातेय. पण सध्या संस्थानचा कारभार न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरूय. त्यामुळं सुमारे 500 कोटींच्या या योजनेच्या मान्यतेसाठीचा हा प्रस्ताव न्यायालयापुढे ठेवण्यात आलाय.
पुढच्या वर्षी साईबाबांचं शताब्दी वर्ष सुरू होतंय. त्यामुळं भक्तांची गर्दी असणारच. अशावेळी पाणी बचतीचा उपाय म्हणून भक्तांना निवासासाठी खोल्या उपलब्ध करून न देणं हा पर्याय ठरू शकत नाही. त्यापेक्षा संस्थाननं पाणी समस्येवर कायमस्वरुपी उपाय शोधणं गरजेचं आहे.