पुणे : नगरपालिकांच्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात अनेक प्रस्थापितांना धक्का बसलाय. तर काही दिग्गजांनी प्रतिष्ठा राखण्यात यश मिळवलंय.
सर्वात लक्षवेधी ठरलेल्या कराड नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का बसलाय. गड आला पण सिंह गेला अशी त्यांची अवस्था झालीय. काँग्रेसला 16 जागा मिळाल्या असल्या तरी नगराध्यक्षपदावर भाजपच्या रोहिणी शिंदे विजयी झाल्या आहेत.
तर दुसरीकडे सांगलीचे भाजपचे खासदार संजय काका पाटील यांना कवठे महांकाळमध्ये धक्का बसलाय. नगराध्यक्षपदी भाजपच्या उमेदवाराचा पराभव झालाय. पण तासगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करत संजय पाटलांनी प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न केलाय. तर इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटलांना मोठा धक्का बसलाय.
स्वाभिमानी विकास आघाडीनं जयंत पाटलांकडून सत्ता हिरावून नेलीय. साता-यात उदयनराजे भोसलेंच्या सातारा विकास आघाडीनं निर्विवाद सत्ता काबिज केलीय. त्यांच्या आघाडीनं 22 जागांसह नगराध्यक्षपदावरही विजय मिळवलाय. सातारा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसलेंच्या पत्नीचा पराभव झालाय.
फलटणमध्ये विधान परिषदेचे सभापती राजराजे नाईक निंबळकर यांनी सत्ता राखण्यात यश मिळवलंय. तर दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागलमध्ये राष्ट्रवादीचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपली प्रतिष्ठा राखली असून नगरपालिकेवर निर्विवाद वर्चस्व मिळवलंय.
पन्हाळ्यात माजी मंत्री विनय़ कोरे यांच्या जनसुराज्य पक्षानं आपली सत्ता राखलीय. सोलापूर जिल्ह्यात दुधनी नगरपालिकेत माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांना जोरदार धक्का बसलाय. त्यांच्या पन्नास वर्षांच्या सत्तेला भाजपनं सुरूंग लावलाय.