युती तुटल्यावर पिंपरी चिंचवडमधील राजकारण कसे रंगणार...

शिवसेना भाजप युती तुटल्यानंतर काय होणार अशी चर्चा सुरु असतानाच पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही पक्षला हवं तेच झाल्याचं चित्र आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 27, 2017, 09:32 PM IST
 युती तुटल्यावर पिंपरी चिंचवडमधील राजकारण कसे रंगणार... title=

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : शिवसेना भाजप युती तुटल्यानंतर काय होणार अशी चर्चा सुरु असतानाच पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही पक्षला हवं तेच झाल्याचं चित्र आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये युतीसाठी चर्चा होत असली तरी तो फार्सच होता. कारण दोन्ही पक्ष जास्त जागांवर ठाम होते केवळ युती तुटल्याचं पातक नको म्हणून चर्चेचं गुऱ्हाळ सुरु होतं. वास्तविक राष्ट्रवादीला तगडी टक्कर देण्यासाठी भाजपने एका एका प्रभागात असंख्य इच्छूकांना तिकीट देण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यातल्या काही जणांना थांबवताना भाजपच्या नेत्यांना नाकी नऊ येण्याची चिन्हं असताना युती झाली तर तिकीट वाटपाचा पेच भाजपसाठी आणखी वाढणार होता. त्यामुळं भाजपला युती नको होती. सेनेलाही युती नकोच होती कारण भाजप सेनेच्या हक्काच्या जागांवर दावा ठोकत होती. युती तुटल्याचं पातक नको म्हणून सेनेनं जागाही कमी मागितल्या पण मुंबईत युती तुटलीच

मात्र आता युती तुटल्याचा सर्वाधिक फायदा हा राष्ट्रवादीला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मतविभाजनाचा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसंच आघाडीचीही गरज राष्ट्रवादीला उरलेली नसल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 

युती तुटल्यामुळं आता सेना आणि भाजपला शहरातल्या १२८ जागांवर सक्षम उमेदवार देण्याचं मोठं आव्हान आहे कारण यापूर्वी बऱ्याच ठिकाणी त्यांचे उमेदवारच नव्हते. एवढंच नाही तर भाजप सेनेला आता त्यांची खरी ताकत ही कळणार आहे. तूर्तास युती तुटल्याचं शहरातल्या नेत्यांना दु:ख नाही आनंदच आहे हेच खरं.