रत्नागिरी : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा धक्कादायक निकाल लागला तो सिंधुदुर्गातल्या कुडाळमध्ये… नारायण राणेंसारख्या दिग्गज नेत्यावर पराभवाची नामुष्की ओढवली. राणेंच्या पराभवाची नेमकी कारणं काय?
नारायण राणे म्हणजे कोकणचा ढाण्या वाघ... मात्र याच वाघाला कुडाळच्या मतदारांनी नाकारलं... राणेंचा पराभव करून, शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख वैभव नाईक 'जायंट किलर' ठरले.... सुमारे दहा वर्षांपूर्वी नारायण राणे शिवसेनेला जय महाराष्ट्र करून, काँग्रेसच्या तंबूत दाखल झाले. त्यांच्यासह कोकणातील पाच आमदारांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला... शिवसेनेला खिंडार जरूर पडले... पण २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीपासून राणेंची कोकणावरची पकड ढिली पडू लागली. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. निलेश राणेंना विजय मिळाला असला तरी केवळ ५० हजारांनी मिळालेल्या विजयानं राणे समाधानी नव्हते. मताधिक्य का घटलं? याचं गांभिर्यानं विश्लेषण न करताच ते विधानसभा निवडणुकांकडे वळले...
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत राणे समर्थक एकही आमदार कोकणात निवडून आला नाही... त्यानंतरच्या पाच वर्षात माजी खासदार डॉ. निलेश राणे, विद्यमान आमदार नितेश राणे आणि स्वतः नारायण राणेंनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्र्ह्यातील अनेकांना दुखावलं. राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव, सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्याशी त्यांचा पंगा होता. राणेंचे डावे आणि उजवे हात अशी ओळख असलेले राजन तेली, काका कुडाळकर, संजय पडते यांच्यासारखे खंदे राणे समर्थकही २०१४ च्या विधानसभा निवडणुकीआधी दूर गेले... त्यामुळं राणे एकाकी पडले...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी नारायण राणेंनी पुढाकार घेतला नाही... उलट त्यांनी त्यांच्या मागण्यांकडं दुर्लक्ष केलं... त्याचा फटका राणेंना बसला.
नारायण राणेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेकांना विविध कामांची ठेकेदारी मिळवून दिली... हे ठेकेदार आणि दुसऱ्या तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते राणेंच्या नावाचा गैरवापर करत स्थानिक जनतेला त्रास देत होते. त्यामुळं देखील राणेंची प्रतिमा डागाळत गेली...
अखेर कुडाळ मतदारसंघातल्या जनतेनं राणेंना पराभूत करून, शिवसेनेच्या वैभव नाईकांना विजयी केलं. २० वर्षांपूर्वी याच वैभव नाईकांच्या काकांची, श्रीधर नाईक यांची राजकीय हत्या झाली होती. राणे हरले, पण कणकवलीतून त्यांचे धाकटे चिरंजीव नितेश राणे विजयी झाले... एका डोळ्यात हसू आणि दुस-या डोळ्यात अश्रू, असा काव्यगत न्याय झाला...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.