नाशिक : येथे एक असा दर्गा आहे जिथं केवळ महिलांनाच प्रवेश मिळतोय. राज्यातच नव्हे तर देशात एकमेव असलेला हा दर्गा महिलांचा पवित्र दर्गा म्हणून ओळखला जातोय.
हा आहे जुन्या नाशिकचा सय्यदानी माँजी साहेबांचा दर्गा.. हजरत पीर सादिक शेख रहेमेतुल्ला साहेबजादा यांची ही मुलगी. सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी मदिना इथून सूफी संत सय्यद सादिक शहा हुसैनी नाशिकमध्ये आले. त्यांनी जादूटोण्याच्या गर्तेतून नाशिककरांची सुटका केली. हुसैनी बाबांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी लोकांनी त्यांची चार मुलं आणि एका मुलीचा दर्गा बांधला.
वडिलांप्रमाणे पूजनीय ठरलेल्या माँ साहेबांच्या या दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळतो असा हा देशातला एकमेव दर्गा आहे. वर्षातून एकदा इथं ऊरुस शरीफ संदलही केला जातो... महिलांनी दिलेल्या वर्गणीतूनच दर्ग्याची वास्तू उभी राहिलीय. हुसैनी यांनी इथं येणा-या महिलांना शाकाहारी असणं बंधनकारक केलंय.
आजही दर्ग्यात मांसाहार केला जात नाही. केवळ मुस्लिमच नाही तर विविध धर्माच्या महिला या दर्ग्यात येतात. त्यामुळं हा दर्गा राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक बनलाय. सध्या शनिशिंगणापूर आणि त्र्यंबकेश्वरमध्ये महिला प्रवेशाचा वाद पेटलाय. हाजी अलीच्या दर्ग्यात तर कोर्टाच्या आदेशानंतर महिलांना प्रवेश मिळालाय. त्यामुळं नाशिकमधील केवळ महिलांनाच प्रवेश असलेला हा दर्गा खऱ्या अर्थानं वेगळा ठरला आहे.