नागपूर : विशीतल्या तरुण-तरुणीच्या जोडप्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. नागपूरच्या फुटाळा तलावामध्ये दुपारी साडेतीनच्या सुमारास या दोघांनी उडी मारली. प्रेमसंबंधातून ही आत्महत्या झाल्याची चर्चा आहे. तांडापेठ भागामध्ये राहणारे हे दोघं एकाच वर्गात शिकणारे होते.
नितीन मौंदेकर आणि ऐश्वर्या तालेवाडे अशी या दोघांची नावं आहे. यातला नितीन हा 21 वर्षांचा तर ऐश्वर्या 20 वर्षांची होती. पोलिसांनी याबाबत अधिक माहिती दिली नसली तरी हे दोघं मित्रांसोबत फुटाळा तलाव भागात फिरायला आले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
नितीननं एका मित्राला एसएमएसकरून आपण आत्महत्या करणार असल्याचं कळवलं होतं. या दोघांच्या आत्महत्येच्या नेमक्या कारणाचा पोलीस तपास करत आहेत. याप्रकरणी दोन प्रत्यक्षदर्शी महिला असून त्यांचाही पोलीस शोध घेत आहेत.