ठाण्यात आघाडीचा तिढा अखेर सुटला

मुंबईपाठोपाठ ठाण्यात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. राष्ट्रवादीला 70 जागा तर काँग्रेसला 60 जागा सोडण्यात आल्या आहेत

Updated: Jan 18, 2012, 06:18 PM IST

www.24taas.com, ठाणे

 

मुंबईपाठोपाठ ठाण्यात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. राष्ट्रवादीला 70 जागा तर काँग्रेसला 60 जागा सोडण्यात आल्या आहेत. मुंबईतील जागावाटपाच्या फॉर्मुल्यानंतर ठाण्याच्या जागावाटपाकडे सा-यांचे लक्ष लागलं होत. पण युतीच्या बालेकिल्ल्यात कॉंग्रेस राष्ट्रवादीचं अनेक दिवस चर्चेचे गु-हाळ रंगले होते. आज अखेर हा तिढा सुटलाय.

 

दरम्यान मुंबईतलं वॉर्डवाटप जवळपास पूर्ण झाल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिलीय. मात्र काही वॉर्डांवर काँग्रेससह राष्ट्रवादीनंही दावा केल्यामुळं वॉर्डवाटपाचा तिढा कायम आहे. तर नाशिक, नागपूर आणि अकोल्यात जागावाटपाच्या सूत्रासंदर्भात आज संध्याकाळी एकत्र घोषणा करणार असल्याचं दोन्ही पक्षांकडून सांगण्यात आलं आहे.

 

ठाण्यात आयाराम गयाराम संस्कृती रुजली आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाड यांना कंटाळून मुंब्रा-कळवा भागातल्या अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीतही शिवसेनेतुन मोठ्या प्रमाणावर नेत्यांची आयात सुरु आहे. निवडणुकीत तिकिट मिळण्याची खात्री नसलेले अनेक जण पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक हरिष वैती यांनी देखील आव्हांडांच्या मनमानी कारभार आणि कार्यपद्धतीला कंटाळून शिवसेनेत प्रवेश केला आहे.