www.24taas.com, मुंबई
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप आणि रिपाइ युतीच्या जागावाटपाची अधिकृत घोषणा होऊन काही तास
होण्याच्या आतच दीपक निकाळजेंनी महायुतीला निर्वाणीचा इशारा दिला आहे. जागावाटपात प्रभाग क्रमांक ११२ कन्नमवारनगर आणि १४४ सिद्धार्थनगर हे दोन प्रभाग मिळाले नाहीत तर वेगळी वाट चोखाळावी लागेल असं निकाळेजेंनी झी २४ तासशी बोलताना सांगितलं.
मागच्या निवडणुकीत विक्रोळीतील कन्नमवारनगरमध्ये मनसेचा तर सिद्धार्थनगरमध्ये काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला होता. यावेळेस प्रभाग क्रमांक ११२ शिवसेनेकडे तर प्रभाग क्रमांक १४४ भाजपच्या वाट्याला आले आहेत.
महायुतीच्या जागावाटपाबाबत रिपाइचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही नाराजी व्यक्त केली होती. मुलुंड, विक्रोळी आणि वरळी इथे दलित मतदार मोठ्या प्रमाणावर असल्याने हे प्रभाग रिपाइला मिळावेत अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. पण जागा वाटपावरुन महायुती तुटू नये यासाठी आपण आग्रही राहिलो नाही असं आठवलेंनी सांगितलं. रिपाइच्या वाट्याला २९ जागा आल्या आहेत.