मुंबईत काँग्रेस नेत्यांमध्ये समन्वय नव्हता, अशी टीका करत वनमंत्री पतंगराव कदम यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. मात्र पराभवाला केवळ काँग्रेसच जबाबदार नसून राष्ट्रवादीही जबाबदार आहे, अशी बाजूही सावरुन घेतली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असतांनाही राष्ट्रवादीनं बंडखोर उभे केले. त्यामुळे निवडणुकीत अपयश आलं अशी टीका कदम यांनी केली.
नारायण राणे यांच्यानंतर पतंगरावांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनीही कॉंग्रेसमधल्या चुकांवर बोट ठेवलं. त्याबरोबरच राष्ट्रवादीलाही फटकरण्याची संधी पतंगरावांनी सोडली नाही. सांगली जिल्हा परीषदेमध्ये राष्ट्रवादीची सरशी झाली. त्यामुळे पतंगरावांनी मुंबईतल्या आघाडीच्या कामगिरीवर भाष्य करताना राष्ट्रवादीला लक्ष केलं आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत चुकीचे तिकिटवाटपामुळे मोठ्या प्रमाणावर नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या नाराजीचा फटका काँग्रेसला बसला. त्यातच बंडखोरांनी अनेक ठिकाणी काँग्रेस उमेदवारांच्या पराभवाला हातभार लावला. त्यामुळेच काँग्रेसला अवघ्या ५० जागांवर समाधान मानावं लागलं. मागच्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसच्या कामगिरीच्या आलेखात मोठा घसरण झाली. मागील वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी केली नसतानाही काँग्रेसने चांगले यश मिळवलं होतं.