अग्नितांडवाचे पाच बळी

मंत्रालयातल्या अग्नितांडवातल्या बळींची संख्या पाच झालीय. काल तिघांचे मृतदेह सापडले होते. तर आज आणखी दोन मृतदेह हाती लागले. आज मंत्रालयातील चोपदार मोहन मोरे आणि तुकाराम मोरे या दोघांचे मृतदेह लागले हाती.

Updated: Jun 22, 2012, 01:34 PM IST

 www.24taas.com, मुंबई

 

मंत्रालयातल्या अग्नितांडवातल्या बळींची संख्या पाच झालीय. काल तिघांचे मृतदेह सापडले होते. तर आज आणखी दोन मृतदेह हाती लागले. आज मंत्रालयातील चोपदार मोहन मोरे आणि तुकाराम मोरे या दोघांचे मृतदेह लागले हाती.

 

उमेश पोतेकर, महेश गुगळे, शिवाजी कोरडे या तिघांचे मृतदेह गुरुवारी रात्री हाती लागले होते. यात बारामतीच्या उमेश पोतेकर आणि महेश गुगळे या दोघांचा तर अकोल्याच्या शिवाजी कोरडे यांना जीव गमवावा लागला होता. यानंतर कालपासून बेपत्ता असलेल्या मोहन मोरे आणि तुकाराम मोरे या दोघांचे मृतदेह हाती लागलेत. सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांच्या केबिनजवळ हे या दोघांचे मृतदेह सापडले.

 

बारामती सहकारी बँकेचे संचालक आणि माजी अध्यक्ष महेश पोतेकर आणि बारामतीचे बारामती मर्चंट असोसिएशनचे उपाध्यक्ष उमेश गुगळे  या दोघांचेही मृतदेह बारामतीमध्ये आणण्यात आलेत. या युवा पदाधिका-यांच्या मृत्युनं संपूर्ण बारामतीवर शोककळा पसरलीयं. विशेष म्हणजे हे दोघेही शाळेतही एकाच वर्गात शिकलेले होते. मित्रपरिवार आणि कुटुंबियांनी मृतदेह पाहताच एकच हंबरडा फोडला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी हे दोघंही मंत्रालयात गेले होते. मंत्रालयातल्या आगीत अडकल्यानंतर उमेश यांनी बारामतीमधील त्यांचे भाऊ मनोज यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला  आणि मदतीसाठी याचना केली. मात्र, त्यानंतर धुराच्या लोटात ते अडकले गेल्यानं मोबाईलची रेंजही गेली आणि त्यानंतर त्यांचा संपर्कही तुटला तो कायमचाच. आपण आगीत आणि धुरात वेढले गेले आहोत, अजितदादांना सांगा आमची सुटका करा, अशी आर्जव त्यांनी मोबाईलद्वारे भावाकडे केली. त्यानंतर उमेश यांच्या भावाने अजितदादांशी मोबाईलद्वारे संपर्क साधून याबाबत माहिती दिली. मात्र, या दोघांना अजितदादांची कोणतीही यंत्रणा वाचवू शकली नाही. आगीत आणि धुरात पूर्णतः वेढले गेल्याने अखेर गुदमरून या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. उमेश आणि महेश यांच्या मृत्युची बातमी समजताच बारामतीमध्ये शोककळा पसरली. बारामतीमधील बाजारपेठ आज बंद ठेवण्यात आलीये.

 

.