www.24taas.com, मुंबई
मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सर्व 288 जागा लढविण्याची चाचपणी सुरू केल्याचं समजतंय.
त्याबाबत मुंबईत अजिदादांच्या देवगिरी बंगल्यावर बुधवारी झालेल्या राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ मंत्र्यांच्या बैठकीत 288 जागांतील पक्षाची स्थिती स्पष्ट करणारे अहवाल नेत्यांच्या हातात ठेवण्यात आले. मात्र याची वाच्यता टाळण्यासाठी सध्या असलेल्या 122 जागांवर लक्ष केंद्रीत करून जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यावर भर देण्यात आल्याची सारवासारव राष्ट्रवादीकडून केली गेली.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधली सत्ताकारणावरून काँग्रेस आघाडीत साठमारी सुरू झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी आघाडीबाबत काँग्रेसनं निर्णय घ्यावा अशी टोकाची भाषा केली होती. तर पक्षाध्यक्ष शरद पवारांनी सबुरीचा सूर लावला होता. मात्र 288 जागा राष्ट्रवादीनं स्वबळावर लढवल्यास पक्षाला मुख्यमंत्रीपदावर दावा करता येईल असा सूर बुधवारच्या बैठकीत निघाला.
त्यादृष्टीनं राष्ट्रवादीचं उपाध्यक्ष वसंत वाणी यांनी तयार केलेला अहवाल वैठकीत ज्येष्ठ मंत्री आणि नेत्यांना सोपवल्याचं समजतंय.