www.24taas.com, मुंबई
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडी झाली खरी मात्र आघाडीबाबत काँग्रेसमध्ये असंतोष पसरला आहे. मुंबईतल्या काँग्रेस खासदार आमदारांच्या बैठकीत राष्ट्रवादीला ४५ जागा देण्याचं ठरलं असताना ५८ जागा दिल्य़ाच कशा असा सवाल आमदार-खासदारांनी विचारला आहे. राष्ट्रवादीला १३ जागा वाढवून दिल्यामुळं काँग्रेसला दोन नंबरवर असलेल्या १० ते १२ जागांवर पाणी सोडावं लागणार आहे.
मुख्यमंत्र्यांना मुंबईतल्या काँग्रेसच्या नगरसेवकांच्या संख्येबाबत अंधारात ठेवले गेल्याची भावनाही काँग्रेसमध्ये आहे. त्यामुळं काँग्रेसमध्ये नाराजी आणि बंडखोरीचे संकेत मिळत आहेत. मुंबई महापालिकेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होण्यासंदर्भात तिढा काल सुटला. मुख्यमंत्री निवासस्थान असलेल्या वर्षावर जवळपास अडीच तासांच्या बैठकीनंतर आघाडीवर शिक्कामोर्तब झालं.
राष्ट्रवादी काँग्रेसने ६५ जागांची मागणी केली होती पण ५८ जागा त्यांना देण्यात आल्या. अखेर महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याने शिवसेना समोर मोठं आव्हान उभं ठाकले आहे. मात्र मागच्या वेळेस अवघ्या एका जागेवरून आघाडी होऊ शकली नव्हती. कुर्ला येथील राजहंस सिंग यांच्या प्रभागावरून आघाडी तुटली होती.