दिनेश मौर्या, www.24taas.com, मुंबई
आदर्श सोसायटीमधील १०४ फ्लॅट्सच्या मालकांपैकी बहुतांश बोगस असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. फ्लॅट्सच्य़ा मालकीबाबत सीबीआयनं दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती देण्यात आली आहे.
ज्यांच्या नावावर हे फ्लॅट्स आहेत ते अस्तित्वातच नसल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. त्यामुळं आदर्श सोसायटीच्या अडचणीत वाढ झाली आहे. हे फ्लॅट्स विकत घेण्यासाठी जी पैशांची देवाण घेवाण झाली आहे तो पैसा हवाला माध्यमातून आला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ज्या १३ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे त्या व्यतिरिक्तही इतर लोकांनी बोगस डॉक्युमेंट्स दाखवूनच फ्लॅट्स खरेदी केली आहे.
याशिवाय मनी लॅड्रींग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनाही १२ मार्चला हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. मनी लॅड्रींग प्रकरणात कोणतीही कारवाई केली नसल्यानं कोर्टानं ईडीच्या अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश दिलेत. हे जेव्हा कोर्टात हजर राहातील तेव्हाच याचा खुलासा होईल.