www.24taas.com, मुंबई
मुंबईत आपलं स्वत:चं घर असावं अशी आपली प्रत्येकाचीच इच्छा असते. म्हाडाच्या घरकुल योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. मात्र म्हाडाच्या घरांची संख्या आणि येणाऱ्या अर्जाची संख्या यात बरीच तफावत आहे. त्यामुळे प्रत्येकाला घर मिळणं तसं कठीणच आहे.
त्यामुळे सध्या गगनाला भिडलेल्या घरांच्या किमती व वाढणार्या झोपडपट्ट्यांवर उपाय म्हणून एमएमआरडीएमार्फत भाडेतत्त्वावरील घरे बांधण्याची योजना हाती घेण्यात आली असून यासाठी आलेल्या ४१ प्रस्तावांपैकी २० प्रस्तावांना मान्यता देण्यात आली.
त्यातील १७ प्रकल्पांचे बांधकाम सुरू झाले असून त्यातून ३७ हजार घरे उपलब्ध होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. याबाबत विधानसभा सदस्य एकनाथ शिंदे व अन्य सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता.