www.24taas.com, मुंबई
लग्न म्हंटल की विचार केला जातो तो लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज अशा प्रकारामध्ये, पण आता फेसबुक मॅरेज अशीसुद्धा संकल्पना अस्तित्वात आली आहे. त्यामुळे सध्या फेसबुकवर ओळख झाली की, त्याचं रूपांतर प्रेम, लग्न अशा स्वरूपात होतं. पण आता सावध व्हा. फेसबुकवरील व्यक्तीवर किती विश्वास ठेवायचा हे ध्यानात असू द्या.
कुवेतमध्ये एका बड्या कंपनीत मॅनेजर पदावर कामाला असून तेथे चांगली प्रॉपर्टीदेखील आहे. अशा पद्धतीचे फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर आपले हायफाय प्रोफाईल तयार करून त्याद्वारे चांगल्या पगार असलेल्या पाच तरुणींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर त्यांच्याशी लग्न करून एका ४० वर्षीय इसमाने त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
रियाज एन.के.अब्दुल्ला हमजा असे त्याचे नाव असून त्याने आठ महिन्यांत पाच तरुणींशी लग्न करून पैसे उकळल्यानंतर त्यापैकी चार जणींना घटस्फोट दिला आहे. पाचव्या तरुणीला काडीमोड देण्याच्या तयारीत असताना त्याची भामटेगिरी समोर आली. पाचव्या तरुणीने टिळकनगर पोलीस ठाण्यात रियाजविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
रियाजने फेसबुक या साइटवर आपले हायफाय प्रोफाईल तयार केले असून त्याद्वारे तो चांगल्या कंपनीत उत्तम पगार असलेल्या तरुणींशी मैत्री करतो. त्यांनतर आपला मोठेपणा सांगत त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढतो. एखादी तरुणी जाळ्यात सापडली की तिच्याशी लग्न करतो. लग्नानंतर त्या तरुणीकडून पैसा उकळून शारिरीक संबंध प्रस्थापित केल्यावर तो त्यांना तलाक देतो. अशा प्रकारे त्याने गेल्या आठ महिन्यांत चार तरुणींशी लग्न करून त्यांना काडीमोड दिला आहे.