पुणे दहशतवाद्यांची धर्मशाळा – खडसे

पुण्यात झालेल्या स्फोटानंतर विरोधी पक्षाने सरकारवर सडकून टीका केली आहे. पुणे धर्मशाळा झाली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. ते म्हणाले, 'आजच पदभार स्विकारलेले गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आज पुण्यात येणार होते आणि त्याच वेळी पुण्यात स्फोट होत आहेत हा काही योगायोग वाटत नाही.

Updated: Aug 1, 2012, 09:59 PM IST

www.24taas.com, मुंबई  

पुण्यात झालेल्या स्फोटानंतर विरोधी पक्षाने सरकारवर सडकून टीका केली आहे. पुणे धर्मशाळा झाली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. ते म्हणाले, 'आजच पदभार स्विकारलेले गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आज पुण्यात येणार होते आणि त्याच वेळी पुण्यात स्फोट होत आहेत हा काही योगायोग वाटत नाही.

दहशतवाद्यांकडून जाणिवपूर्वक केलेले हे कृत्य वाटत आहे.'  यातून तरी सरकार धडा घेणार आहे की नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पुण्यातील गजबजलेल्या जंगली महाराज रस्त्यावर संध्याकाळी आठच्या सुमारास चार ठिकाणी कमी तीव्रतेचे बॉम्बस्फोट झाले . गरवारे कॉलेज, बालगंधर्व रंगमंदिर, मॅकडोनाल्ड आणि देना बॅंकेसमोर झालेले हे स्फोट कमी तीव्रतेचे असले तरी बॉम्बस्फोटच असून, यात एक जण जखमी झाला आहे.
बालगंधर्व रंगमंदिराच्या मागच्या दारात सापडलेली एक बेवारस बॅग तपासण्यासाठी जात असताना हा स्फोट झाला. तपासणीसाठी गेलेले दयानंद भाऊराव पाटील या स्फोटात जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

त्याचसोबत जंगली महाराज रस्त्यावरच असलेल्या मॅकडोनाल्डसमोर कचरा पेटीत आणि देना बँकेसमोर सायकलवर अशाच प्रकारचे स्फोट झाले. सुदैवाने यात कोणालाही इजा पोहचलेली नसल्याचे कळते.

हे स्फोट जरी कमी तीव्रतेचे असले तरी हे बॉम्बस्फोटच असल्याचे पोलिसांनी सांगितले. स्फोटाच्या ठिकाणी वायर, सर्किट आणि ९ वोल्टची बॅटरी असे साहित्यही सापडले आहे. घटनास्थळी एटीएस आणि पोलीस पोहचले असून त्यांनी परिसरात नाकाबंदी केली आहे. शहरभर सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून तपासकार्य सुरू झाले आहे