प्रकल्प 'जैतापूर', ठेवा महाराष्ट्रापासून दूर!

जैतापूर प्रकल्पग्रस्तांच्या पाठिशी शिवसेना सदोदित उभी राहिली, याचा पुनरुच्चार शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केलाय. तर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित असल्याचं मत अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष अनिल काकोडकर यांनी म्हटलंय.

Updated: Dec 1, 2011, 04:59 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

जैतापूर प्रकल्पग्रस्तांच्या पाठिशी शिवसेना सदोदित उभी राहिली, याचा पुनरुच्चार शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केलाय. तर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित असल्याचं मत अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष अनिल काकोडकर यांनी म्हटलंय. ही परस्परविरोधी मतं मांडण्यात आली ती एकाच कार्यक्रमात. जैतापुर अणुऊर्जा प्रकल्प होऊ देणारच नाही ही भूमिका घेणाऱ्या शिवसेनेनं एक पाऊल पुढे टाकत जैतापूर प्रकल्प हवा की नको या विषयावर शिवाजी पार्कात सावरकर स्मारकात.

 

चर्चासत्राचं आयोजन केलं होतं. या चर्चासत्रात दोन्ही बाजूंनी चर्चा झाली. प्रकल्पाग्रस्तांच्या बाजूनं तज्ज्ञांनी मतं मांडली, तर सर्वोच्च न्यायालयाचे निवृत न्यायाधीश ए.पी शहा, अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष अनिल काकोडकर, अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष श्रीकुमार बॅनर्जी उपस्थीत होते. यावेळी प्रकल्पाला विरोधच राहील, या भूमिकेचा पुनरुच्चार उद्धव ठाकरेंनी केला. तर प्रकल्प सुरक्षित असल्याचं काकोडकरांनी सांगीतलं.

 

या प्रकल्पाची बाजू घेऊन जेव्हा डॉ. काकोडकर, श्रीकुमार बॅनर्जी लोकांपुढे भूमिका मांडत होते, तेव्हा उपस्थीत प्रकल्पग्रस्तांनी गोंधळ घालायला सुरवात केली. हा गोंधळ इतका वाढला की खुद्द उद्धव ठाकरेंना शांत राहण्याचं आवाहन करावं लागलं.  या चर्चेत दोन्ही बाजूंकडून मोठा उहापोह करण्यात आला. मात्र कुणाच्याही भूमिकेत तसूभरही फरक पडलेला जाणवला नाही. त्यामुळे या चर्चेनी नक्की काय साधलं, हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला.