www.24taas.com,मुंबई
भारतीय जनता पक्षात महत्त्वाचे स्थान असणारे ज्येष्ठनेते बळवंत ऊर्फ बाळ आपटे यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले. आपटे यांचे हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
माजी खासदार आणि भाजपचे उपाध्यक्ष असलेले आपटे उत्तम संघटक होते. अभाविप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. पक्ष संघटनेत असताना संघ परिवाराशी समन्वय ठेवण्याचे काम त्यांनी उत्तमरीतीने केले. आपटे ज्येष्ठ विधिज्ञ होते. राज्यसभेचे खासदार म्हणूनही त्यांची कारकीर्द गाजली.
एखादा कायदा सोप्या भाषेत समजावून सांगण्याची त्यांची हातोटी होती. अनेक संस्थात्मक कार्याला त्यांनी पाठबळ दिले. त्यातून अनेक कार्यकर्ते घडले. पक्षात एखादे संकट निर्माण झाल्यावर बाळ आपटे त्यावर सर्वांना समजावून घेऊन उत्तम मार्ग काढत. त्यामुळं पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांना त्यांच्या विषयी आदर होता.