मनपा निवडणुकांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी

Updated: Jan 4, 2012, 09:16 PM IST

www.24taas.com , मुंबई

मुंबई ठाण्यासह राज्यातील आठ महापालिकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करण्याचा  निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला असून  मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार की मैत्रीपूर्ण लढती होतील, याबाबत चित्र स्पष्ट झाले नाही.

 

पुणे आणि पिंपरी-चिंचवडबाबत चर्चा सुरू असून लवकरच आघाडीचा निर्णय होईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मधुकर पिचड यांनी झी २४ तासशी बोलताना व्यक्त केला. पुणे पिंपरी चिंचवड येथे स्वबळावर पेक्षा काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

मुख्यमंत्री निवासस्थानी झालेल्या या बैठकीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधूकर पिचड, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे,  उद्योगमंत्री नारायण राणे, मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंग, राष्ट्रवादी प्रदेश मुंबई अध्यक्ष नरेंद्र वर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.

 

ठाणे, उल्हासनगर, नाशिक, नागपूर, अमरावती आणि अकोला या महापालिकांमध्ये सध्या भाजप सेना युतीची सत्ता आहे, या ठिकाणांहून युतीला सत्तेतून खाली खेचण्यासाठी दोन्ही काँग्रेसने युती केली असल्याचे पिचड यांनी यांनी सांगितले.

 

राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर लगेचच काँग्रेस-राष्ट्रवादीने मोर्चे बांधणीला सुरूवात केली. नेहमी प्रमाणे आघाडीसंदर्भात घोळ न घालता दोन्ही काँग्रेसने लवकर आघाडी करून जागा वाटपासाठी वेळ दिला असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केला  आहे.

 

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होईल का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील आघाडीवर येत्या दोन-तीन दिवसांत निर्णय होणार असल्याचं मधुकरराव पिचड यांनी म्हटलं आहे.काँग्रेस आणि राष्ट्रवादीने यापूर्वीची मुंबई महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढवली होती.