अमित जोशी, www.24taas.com, मुंबई
मतदार यादीतले अनेक घोळ पुढे येत आहेत. मानखुर्दमध्ये साठे नगर भागातील २५०० पेक्षा जास्त मतदारांची मतदार यादातील नावे वॉर्ड क्रमांक १३७ मधून १३९ मध्ये गेल्याने रहिवासी संताप व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे एकाच घरातील काही व्यक्ती एका वॉर्डमध्ये तर काही व्यक्ती दुसऱ्या वार्डमध्ये असा अजब प्रकारही या भागात घडला आहे.
वॉर्ड क्रमांक १३७ च्या साठे नगरमधील लक्ष्मण सोनावणे हे २४ जानेवारीला जाहीर झालेली नवी मतदार यादी बघुन चक्रावून गेले होते. सोनावणे आणि त्यांच्या पत्नीची नावं वॉर्ड क्रमांक १३९ मध्ये आहे. तर त्याच घरात रहाणाऱ्या त्यांच्या दोन्ही मुलांची आणि सुनांची नावं ही १३७ वॉर्डमध्ये राहिली आहेत. या आधीच्या निवडणुकीपर्यंत म्हणजे २००९ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत या सर्वांची नावे १३७ वॉर्ड मध्येच होती. असा प्रकार अनेकांच्या घरात झाला असल्याचं इथल्या रहिवाशांनी सांगितलं. साठे नगरमधील तब्बल अडीच हजारपेक्षा जास्त मतदार नव्या मतदार यादीमुळे दुसऱ्या वॉर्डमध्ये गेले आहेत.
निवडणूक आयोगाकडे या संदर्भात रहिवाशांनी तक्रारही केली. मात्र याची गंभीर दखल आयोगाने घेतली नसल्याचं रहिवाशांनी सांगितलं. एवढी एकगठ्ठा मते मोठ्या प्रमाणात दुसऱ्या वॉर्डमध्ये गेली असल्याने यामागे मोठं राजकारण होत असल्याचा आरोप रहिवासी करत आहेत.