मुंबई विमानतळ आणि खासगी विमान कंपन्यांमध्ये जुंपली

मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड म्हणजेच MIAL ने मुंबई विमानतळावर खाजगी विमान कंपन्यांना पार्किंग चार्जेसमध्ये भरमसाठ वाढ केलीयं. MIAL च्या या तुघलकी निर्णयाविरोधात खाजगी विमान मालकांनी तीव्र असंतोष व्यक्त केलाय.

Updated: Jul 12, 2012, 04:13 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड म्हणजेच MIAL ने मुंबई विमानतळावर खासगी विमान कंपन्यांना पार्किंग चार्जेसमध्ये भरमसाठ वाढ केलीयं. MIAL च्या या तुघलकी निर्णयाविरोधात खाजगी विमान मालकांनी तीव्र असंतोष व्यक्त केलाय. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी MIAL ची बैठक होत आहे. या बैठकीत यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

 

मुंबईतल्या कलिना टर्मिनलवरून खाजगी विमान कंपन्या तसंच खाजगी व्यावसायिकांची विमानं उड्डाण घेत असतात. यासाठी एअरपोर्ट एथॉरिटीला पार्किग चार्ज दिला जातो. मात्र, आता मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड म्हणजेच MIAL ने एक तुघलकी निर्णय घेत 72 तासांपेक्षा जास्तवेळ थांबणा-या विमानांना त्यानंतर प्रतीतास 1 हजार ते 15 हजार रुपये पार्किंग चार्ज भरण्याचं फर्मान सोडलंय. विशेष म्हणजे  देशातल्या कुठल्याही एअरपोर्टवर अशा प्रकारचा पार्किंग चार्ज आकारला जात नाही. खरंतर एअरपोर्टवर य़ेणारी सर्व खाजगी विमानं ही डीजीसीएद्वारा मान्यताप्राप्त आहेत, तसंच नियमानुसार एअरपोर्ट एथॉरिटीला पार्किग चार्जही दिला जातो. मात्र, तरीही अधिकार नसतानाही MIAL ने अशा प्रकारचा अवाजवी पार्किंग चार्ज आकारल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येतेय.

 

आयआरबी इन्फ्राला 18 लाख, डेक्कन एअरला 4 लाख, एल एन्ड टीला 3 लाख आणि इंडियाबुल्सला 1 लाख रुपये भरण्याचं फर्मान सोडण्यात आलंय. MIAL ने या पार्किंग चार्जचं आधीच समर्थन केलंय. मात्र, खाजगी कंपन्यांचा वाढता विरोध लक्षात घेता आता यावर पुनर्विचार करण्याची भूमिका घेतली आहे. एअरपोर्ट एथॉरिटीची कुठलीही परवानगी न घेता MIAL अशा प्रकारे चार्ज आकारूच कसा शकते, असा सवाल करण्यात येतोय. कलिना टर्मिनलवर विमानांची संख्या वाढू लागल्याने MIAL त्याचा गैरफायदा घेण्याच्या विचारात असल्याचा आरोप करण्यात येतोय.

 

कलिनामध्ये एकावेळी 60 विमानं उभी राहू शकतात. मात्र, प्रत्यक्षात 27 विमानांनाच पार्किंगची जागा देण्यात येते. अशावेळी पार्किंगबाहेर विमानं उभी करण्याशिवाय इतर पर्याय रहात नाही. त्यातचं नियम डावलून किंगफिशरलाही पार्किंगची  जागा देण्यात आलीये. त्यामुळे इतर खाजगी विमान कंपन्यांना आपल्या विमानांच्या पार्किंगसाठी ताटकळत बसावं लागतं. म्हणूनच कुठल्याही परिस्थितीत अशा प्रकारचा मनमानी पार्किंग चार्ज खाजगी विमान कंपन्या देणार नाहीत, अशी ठाम भूमिका खाजगी कंपन्यांनी घेतलीये. यावर आता MIAL काय निर्णय घेते याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.