www.24taas.com, मुंबई
येत्या ६ तारखेला रेल्वेभरतीची परीक्षा देणार असणाऱ्या मराठी तरुणांना मर्गदर्शन देण्यासाठी राज ठाकरे यांनी तातडीने बैठक बोलावली. रेल्वेच्या परीक्षांची तयारी करत असलेल्या मुलांपर्यंत मनसेतर्फे मार्गदर्शक पुस्तिका आणि सीडी पोहोचवण्याचं काम राज यांनी पदाधिकाऱ्यांवर सोपवलं आहे. यातून मराठी तरुणांना नोकऱ्या मिळतील आणि त्यांचे संसार सुखाचे होतील, त्यांचे आई-वडिल आनंदी होतील, अशी आशाही राज यांनी व्यक्त केली आहे.
मनसेची जेवढी आंदोलनं झाली, त्यातील महत्त्वाचं आंदोलन हे रेल्वेमध्ये मराठी तरुणांना नोकरी मिळावी यासाठी होतं. “ममता बॅनर्जींनी रेल्वेमंत्री झाल्यावर स्थानिकांना रेल्वेमधील नोकरीत प्राधान्य दिलं जावं असं सांगितलं, त्यानंतर सरकारचे डोळे उघडले.” असं आपल्या भाषणात राज ठाकरे म्हणाले. त्याचबरोबर, “आंदोलनं केल्यावरच सरकारचे डोळे आणि कान का उघडतात?” असा सवालही राज यांनी केली.
भारतीय रेल्वे ही जर भारतीय आहे, तर महाराष्ट्रातील मुलांना रेल्वेत नोकऱ्या का मिळत नाहीत? इतके वर्षं यु.पी., बिहारमधील मुलं येऊन परीक्षा देत होते. पण, मराठी तरुणांना या परीक्षेची साधी माहितीही मिळत नव्हती, यामागे काही जणांचा छुपा अजेंडा होता, असं म्हणत राज यांनी पुन्हा परप्रातियांवर निशाणा साधला.
यावर्षी जवळपास ४ ते ५ लाख मराठी मुलांनी रेल्वे परीक्षांचे फॉर्म्स भरले असल्याची माहिती राज यांनी यावेळी दिली. येत्या ६ तारखेला रेल्वेभरती परीक्षा होणार आहेत. त्यासाठी मराठी मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी मनसेतर्फे मार्गदर्शन पुस्तिका आणि सीडी वाटप होणार आहे.