झी २४ तास वेब टीम, मुंबई
अण्णांना समर्थन देण्यासाठी रणमैदानावर देशाच्या कानाकोप-यातून लोक जमा होतायत. यामध्ये बच्चे कंपनीही मागे नाही. जुहूतून महात्मा गांधी पुतळा येथून रॅलीला सुरूवात झाली. जुहूतून अण्णा हजारे यांची ट्रकमधून रॅली सुरू झाल्यानंतर प्रचंड जनसमुदाय जमला होता. त्यामुळे लोकपालसाठी मुंबईत अण्णामय वातावरण दिसून आले आहे.
अण्णांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयबीनं मुंबई पोलिसांना अलर्ट राहण्याचा इशारा दिलाय. अण्णांच्या आंदोलनाच्या ठिकाणी प्लास्टिक बॅग्जना मज्जाव करण्यात आलाय. दरम्यान, लोकपाल विधेयक मंजूर करण्यासाठी आजपासून संसदेत तीन दिवस चर्चा होणार आहे. लोकपालवर दुपारी २ वाजचा संसदेत चर्चा होणार आहे. या विधेयकामधल्या तरतुदींवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. सरकारने अण्णांच्या चारही मागण्या फेटाळल्यात.
अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देणार असल्याचं मुस्लिम संघटनांनी जाहीर केलंय. काँग्रेसनं अण्णांच्या आंदोलनाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला असला तरी काँग्रेसच्या भूलथापांनी भुलणार नाही आणि अण्णांच्या आंदोलनालाच पाठिंबा देऊ, अशी ग्वाही मुस्लीम संघटनांनी दिलीय. अण्णांच्या आंदोलनाला जास्तीत जास्त पाठिंबा मिळावा, यासाठी अण्णांचे सहकारी अरविंद केजरीवाल यांनी क्रॉफर्ड मार्केटमध्ये काही मुस्लिम संघटनांचे प्रतिनिधी आणि NGO च्या सदस्यांची भेट घेतली. या सगळ्यांनी अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, यासंदर्भात केजरीवाल यांनी चर्चा केली.