www.24taas.com, मुंबई
विधान परिषदेच्या २५ जुलै रोजी होणा-या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने गुरुवारी उमेदवार जाहीर केले. राज्यातील विधानपरिषद निवडणूक अर्ज भरण्याची मुदत काही तासांवर येऊन ठेपली असतांना शिवसेनेने उमेदवार जाहीर केले आहेत. विनायक राऊत आणि अनिल परब हे दोन उमेदवार शिवसेनेने रिंगणात उतरवले आहेत. मात्र, ११ उमेदवारांच्या विजयाची घोषणा बाकी आहे.
शिवसेनेचे कोकणातील नेते परशुराम उपरकर यांना उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती मात्र, शिवसेना नेत्यांकडून त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. यामुळे कोकणात बंडाळी माजण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, संजय दत्त आणि शरद रणपिसे यांना शुक्रवारी उमेदवारी देण्यात आली. काँग्रेसने अद्याप चौथा उमेदवार जाहीर केलेला नाही. काँग्रेसकडून नारायण राणेगटातील व्यक्तीला उमेदवारी मिळण्याची शक्यत वर्तवली जात होती. हा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारीही राणेंवरच टाकण्यात आली होती. मात्र, दुपारी १ पर्यंत काँग्रेसकडून चौथ्या उमेदवाराची घोषणा झालेली नाही.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांना राष्ट्रवादीने संधी दिली असून, भाजपमध्ये गडकरी-तावडे गटाचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादीने नरेंद्र पाटील, पुण्याचे जयदेव गायकवाड आणि गेवराईचे अमरसिंह पंडित यांना उमेदवारी दिली आहे. भाजप उमेदवारांमध्ये आशिष शेलार, भाई गिरकर यांचा समावेश आहे. गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय लातूरचे पाशा पटेल यांना पक्षाने उमेदवारी नाकारली.
बिनविरोध निवड
काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी आमदारकीचा राजीनामा देणारे संजय दत्त, शरद रणपिसे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेंद्र पाटील, जयदेव गायकवाड आणि अमरसिंह पंडित आणि भारतीय जनता पक्षाचे आशिष शेलार, विजय गिरकर, यांना तर शिवसेनेने विनायक राऊत आणि अनिल परब आणि शेतकरी कामगार पक्षातर्फे जयंत पाटील यांचेच अर्ज दाखल झाले आहे. ११ जागांसाठी ही निवडणूक होत असून अकराच अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे या उमेदवारांच्या विजयाची घोषणी बाकी आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे आता स्पष्ट होत आहे.