बॉयफ्रेंडला बाईक गिफ्ट देण्यासाठी सैराट गर्लफ्रेंडनं चोरले आईचे दागिने

एका चोरीच्या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांसमोर असा काही खुलासा झाला की तेही अक्षरश: चाट पडले. 

Updated: May 26, 2016, 09:01 PM IST
बॉयफ्रेंडला बाईक गिफ्ट देण्यासाठी सैराट गर्लफ्रेंडनं चोरले आईचे दागिने title=

नवी मुंबई : एका चोरीच्या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांसमोर असा काही खुलासा झाला की तेही अक्षरश: चाट पडले. 

एका १५ वर्षीय मुलीननं आपल्या बॉयफ्रेंडला स्पोर्टस् बाईक गिफ्ट देण्यासाठी आपल्या आईचेच १.७६ लाखांचे सोन्याचे दागिने चोरल्याचं तपासातून निष्पण्ण झालं.

मुलगीही झाली गायब... 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक डॉक्टर आणि त्यांच्या पत्नीनं आपल्या घरात ९ मे रोजी सात तोळं सोनं चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली होती. याचा तपास करताना अचानक २३ मे रोजी या दाम्पत्याची १५ वर्षांची मुलगी अचानक गायब झाली... आणि दुसऱ्या दिवशी ती सकाळी पुन्हा घरी परतली.   

प्रेमासाठी काहीही... 

अधिक चौकशी केली असता या मुलीचे एका २० वर्षांच्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचं समजलं. या मुलानं नुकतीच एक ८५,००० रुपयांची बाईक विकत घेतल्याचंही समोर आलं. धक्कादायक म्हणजे, एवढी महागडी बाईक विकत घेण्यासारखी या मुलाची आर्थिक परिस्थिती नव्हती.

पावणे दोन लाखांचं सोनं ८५ हजाराला विकलं

मुलीच्या आईचे पावणे दोन लाखांचे सोने बाजारात विकण्यासाठी मुलाला यश येईना... यामुळे, त्यानं आपल्या कॉलेजमधल्या दोन मित्रांची मदत घेतली. त्यांनी खोपोलीतल्या एका सोनाराला हे दागिने केवळ ८५ हजाराला विकून टाकले. 

पोलिसांनी मुलीला आणि तिच्या बॉयफ्रेंडला ताब्यात घेतलंय. पण, हे सत्य बाहेर पडलं तेव्हा पोलिसांनाही धक्काच बसला होता.