www.24taas.com, मुंबई
आज तुम्ही छत्रपती शिवाजी टर्मिनसला गेलात आणि रेल्वे स्टेशनवर आकर्षक रोषणाई पाहिलीत तर आश्चर्यचकित होऊ नका... कारण, भारतीय रेल्वेला १६० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही रोषणाई करण्यात आलीय. रोषणाईचा हा नयनरम्य नजारा पाहून मुंबईकर नक्कीच भारावलेत. सीएसटी परिसर या रोषणाईनं उजळून निघालाय.
खंडप्राय भारताला एकत्र जोडणारा महत्त्वाचा धागा म्हणजे रेल्वे... भारतीय प्रवासी रेल्वेला आज १६० वर्ष पूर्ण होतायत. १६० वर्षांपूवी म्हणजेच १६ एप्रिल १८५३ या दिवशी मुंबई ते ठाणे दरम्यान पहिली रेल्वे धावली. ब्रिटीशांनी आपल्या प्रशासकीय आणि व्यापारी सोयीसाठी रेल्वेचं जाळं देशात विणलं. मात्र, याच रेल्वेनं संपूर्ण देशाला एकत्र करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. महात्मा गांधींना रेल्वेतूनच प्रवास करताना `खरा भारत` दिसला. आजही आम ते खास अशा सर्वच प्रकारतल्या नागरिकांचे आवडते प्रवासाचे माध्यम रेल्वे हेच आहे.
भारतीय रेल्वे हे आशिया खंडातले सर्वात मोठे आणि जगात दुसऱ्या क्रमांकाचे नेटवर्क आहे. देशात दररोज ११,००० रेल्वे धावतात. यामध्ये ७,००० प्रवासी रेल्वे असून ४,००० मालगाड्यांचा समावेश यात आहे.
सह्याद्रीच्या राकट दगडांना भेदत पुढे कोकण रेल्वे असो किंवा अभियांत्रिकीचा अविष्कार मानली जाणारा जम्मू काश्मीरमधला रेल्वे प्रकल्प... रेल्वे ही प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. केवळ मुंबई आणि उपनगर नाही तर संपूर्ण देशाचे रेल्वे लाईफलाईन आहे. देशाच्या सामाजिक सहकार्याचं हे एक उदाहरण आहे.