www.24taas.com, मुंबई
आज २६ नोव्हेंबर...बरोबर चार वर्षांपूर्वी मुंबईवर पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्या हल्ल्यात शेकडो जणांचा बळी गेला होता. तसंच पाकिस्तानातून आलेल्या दहा दहशतवाद्यांपैकी ९ जणांना भारतीय सुरक्षा रक्षकांनी कंठस्नान घातलं होतं. तर जिवंत पकडलेल्या अजमल कसाबला नुकतीच फाशी देण्यात आली. कसाबला फाशी दिल्यामुळं मुंबई हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या नातेवाईकांना काही प्रमाणात आनंद झाला असला तरी पाकिस्तानातल्या दहशतवादी संघटनांचं मात्र पित्त खवळलंय.
भारतात पुन्हा हल्ले करण्याची दर्पोक्ती पाकिस्तानातल्या दहशतवादी संघटनांनी केलीय. २६-११ ला चार वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज मुंबईसह देशभर सुरक्षा वाढवण्यात आलीय. तसंच मुंबईत शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलंय.
२६/११ म्हटलं की सर्वाना आठवतो तो मुंबईवरचा दहशतवादी हल्ला. ब-याच जणांना २६/११ ला संविधान दिवस असल्याचंही लक्षात राहत नाही. वर्धाच्या धनंजय नाखले यांनी या निमित्त चक्क भारतीय घटनाचं हातनं लिहिलीय. पेशानं संगीत शिक्षक असलेल्या नाखले यांनी पाच महिने पंचवीस दिवसांत संपूर्ण घटना लिहून काढलीय. काही तरी वेगळ करून दाखवण्याची जिद्द आणि घरच्यांच्या सहकार्यामुळं हे शक्य झाल्याचं धनंजय नाखले सांगतात.
२६-११ च्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये जीटी हॉस्पिटलमध्ये काम करणारे ठाकूर वाघेला यांचाही समावेश होता...ठाकूर यांनी कसाबला प्यायला पाणी दिलं आणि त्या बदल्यात त्यानं त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. मात्र, त्यांच्या कुटुंबियांना काय मिळाले?
मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना आजतागयात सरकारी मदत मिळालेली नाही. सरकारची मदत आश्वासनांच्या पुढे सरकलेलीच नाहीत. यावर विरोधी पक्ष आरडाओरड करत असले, तरी जन्मजात स्थितप्रज्ञ असलेले गृहमंत्री आर.आर.पाटील मात्र केवळ मदत मिळेल, असंच सांगत आहेत.