बालसुधारगृहात दीड महिन्यात सहा मृत्यू... पाच गतीमंद मुलांचा समावेश!

आदिवासींच्या कुपोषण आणि बालमृत्यूंमुळे राज्यात तीव्र संताप व्यक्त होत असतानाच मुंबईत मानखूर्द इथे 'द चिल्ड्रेन्स एड सोसायटी'च्या बालगृहात दीड महिन्यात एका महिलेसह इतर पाच गतीमंद मुलांचा मृत्यू झालाय. 

Updated: Oct 5, 2016, 11:25 PM IST
बालसुधारगृहात दीड महिन्यात सहा मृत्यू... पाच गतीमंद मुलांचा समावेश! title=

प्रशांत अंकूशराव, मुंबई : आदिवासींच्या कुपोषण आणि बालमृत्यूंमुळे राज्यात तीव्र संताप व्यक्त होत असतानाच मुंबईत मानखूर्द इथे 'द चिल्ड्रेन्स एड सोसायटी'च्या बालगृहात दीड महिन्यात एका महिलेसह इतर पाच गतीमंद मुलांचा मृत्यू झालाय. 

या बालसुधारगृहात 285 मुलं राहतात. त्यात 150 मुलींचा समावेश आहेत. मुली आणि मुलांच्या निवासाच्या जागेत पावसाळ्यात पाणीगळती होते. स्वच्छतागृहं अस्वच्छ असतात. या मुलांचा आहार तसंच औषधासाठी प्रत्यक्षात प्रत्येक मुलासाठी सुमारे तीन हजार रूपयांची गरज असताना केवळ 935 रूपये देण्यात येतात. 

या गतीमंद मुलांच्या आरोग्याच्या तपासणीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची तर सोडाच, एमबीबीएस डॉक्टरचीही नियुक्ती झालेली नाही. बीएएमएस डॉक्टरच्या माध्यमातून मुलांच्या आरोग्याची तपासणी केली जाते. पावसाळ्यात यातील अनेक मुलं आजारी पडत असून गेल्या दीड महिन्यात तापाने आजारी पडलेल्या 18 वर्षांखालील पाच मुलांना आणि तिशीच्या एका महिलेला महापालिकेच्या सायन रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर साधारणपणे तीन चार दिवसातच या मुलांचा मृत्यू झाला. वार्षिक सरासरी लक्षात घेतली तर महिन्याला 2 जणांचा मृत्यू होतोय.

अनेक समस्या असलेल्या या बालसुधार गृहातील गतीमंद मुलांचे मृत्यू होत आहेत तर कोट्यवधी रूपये समाज कल्याण खात्याचं बजेट आहे. तरीही या मुलांचे जीव जात असतील तर यासारखी लांछनास्पद बाब दुसरी नाही. सरकार याकडे किती गांभीर्याने पाहते हा प्रश्न आहे.