मुंबई : झी २४ तास या आघाडीच्या वृत्तवाहिनीने आपली सामाजिक जबाबदारी ओळखून दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हात देऊ केला आहे. यासाठी झी २४ तासने प्रेक्षकांना मदतीचे आवाहन केले आहे.
'दुष्काळावर मात, कुटुंबांना साथ' या उपक्रमात अंतर्गत गेल्या वर्षी २१ जणांची निवड केली होती. यंदा झी २४ तासने महाराष्ट्रातील १९९ शेतकऱ्यांची निवड केली आहे. या शेतकऱ्यांना दुष्काळामुळे आर्थिक विवंचनेला भाग पडावे लागले आहे.
तुमची साथ मिळाली तर यांना जगण्याची नवी उभारी मिळेल आणि पुन्हा काळ्या आईवर हिरवा शालू पसरविण्यात यशस्वी होतील.
संकटं कोणावरही येऊ शकतात. कधी निसर्ग कोपतो, पैशाचं गणितं बिघडतं, कधी तुमच्या हातात नसलेल्या गोष्टींचाही फटका तुम्हाला बसतो. असं झालं की रोजचं जगणंही मुश्किल होऊन जातं...संघर्षाची उर्मी संपते आणि शरिरासकट मनही हतबल होतं.. याचा अर्थ माणसं संकटांवर मात करु शकत नाही असं नाही. मात्र संकटं येतात तेव्हा गरजेचा असतो तो मदतीचा हात, पुन्हा लढण्यासाठी लागतो तो मायेचा ओलावा.. सगळं काही संपलं असं वाटत असतांनात कुठुनतरी मदतीचा हात येतो आणि मग संकटाचा सामना करायला पुन्हा हुरुप येतो.
आज आपल्या राज्यात दुष्काळाचं संकट आलयं. मराठवाडयात तर आपलेच बांधव थेंब थेंब पाण्यासाठी झगडताहेत, दुष्काळानं सगळं आर्थिक चक्रचं ठप्प झालयं...हाताला काम नाही, कामाला दाम नाही, पाणीचं नसल्यानं सगळं जीवनचं सुकुन गेलयं, जनावरचं नव्हे तर माणसं तरी कशी जगवायची हा रोजचा सवाल आहे. हा आहे दुष्काळाचा भयावह चेहरा. दुष्काळ का येतो, दुष्काळावार मात कशी करावी यावर चर्चा होत असली तरी आत्ता या घडीला दुष्काळग्रस्तांना तुमच्या आमच्या मदतीची तातडीनं गरज आहे. परिस्थितीचा रेटाच एवढा भयानक आहे की त्यांना या क्षणी मदतीचा हात हवाय.
तुमची मदत त्यांच्यासाठी मोलाची आहे कारण या क्षणाला जीव वाचणं अधिक गरजेचं आहे. बचेंगे तो और भी लढेंगे असचं जणू दुष्काळग्रस्त म्हणताहेत.. म्हणूनच दुष्काळग्रस्तांना जगवण्यासाठी झी २४ तासनं 'दुष्काळावर मात कुटुंबांना साथ' ही मोहिम सुरु केलीय. आम्ही तुमच्यासमोर मांडतोय दुष्काळग्रस्त्यांच्या व्यथावेदना. या दुष्काळग्रस्तांना तुम्ही थेट चेकव्दारे मदत करु शकता.
दुष्काळग्रस्तांच्या नावानेच तुम्ही थेट चेक लिहा. ही मदत आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू. संकटात सापडलेल्या आपल्याच बांधवांना मदतीचा हात देणं हे आपलं माणूस म्हणून कर्तव्यचं आहे.... पाहुयात खास कार्यक्रम 'दुष्काळावर मात, कुटुंबांना साथ'
पावसाच्या ढगांनी फिरवली पाठ...
दुष्काळाचे ढग मात्र आलेत दाटून...
अन्नदात्या शेतक-याचं दु:ख
आपणही थोडं घेऊ या का वाटून..?
दुष्काळात होरपळणा-या शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी
झी 24 तासचं खास अभियान
दुष्काळावर मात...कुटुंबांना साथ...
तुम्ही सहभागी होऊ शकता या अभियानात
शेतक-यांसाठी आर्थिक मदतीचा हात देऊन...
चला आपणही थोडं, शेतक-यांचं दु:ख घेऊया वाटून वाटून...