www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्य सहकारी बँकेला झालेल्या 1500 कोटी रुपयांच्या तोट्याला तत्कालीन संचालक मंडळ दोषी असल्याचा प्राथमिक निष्कर्ष याप्रकरणाची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी काढला आहे.
या संचालक मंडळात तत्कालीन संचालक उपमुख्यमंत्री अजित पवार, विजयसिंह मोहीते-पाटील, तत्कालीन अध्यक्ष माणिकराव पाटील यांच्यासह तब्बल 50 हून अधिक जण होते. 2011 साली बँकेला झालेल्या तोट्याप्रकरणी संचालक मंडळ बरखास्त करून बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती.
तसेच, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अपर निबंधक शिवाजी पहिनकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. प्राथमिक चौकशीत बँकेला झालेल्या तोट्याला संचालक मंडळाला जबाबदार धरण्यात आलंय. आता या संचालकांना नियम 88 अंतर्गत वैयक्तिक नोटीस बजावली जाणार आहे.
दरम्यान, राज्य सहकारी बँकेने अनेक कारखाने आणि सूतगिरण्यांना कोणतेही तारण न घेता कर्ज दिले आणि त्यामुळेच ही बँक बुडाल्याची टीका विनोद तावडेंनी केलीये. बँक बूडण्यास बँकेचे संचालक मंडळच जबाबदार असल्याचं ते म्हणाले असून दोषी आढळल्यास अजित पवारांनी राजिनामा द्यावा अशी मागणी विनोद तावडेंनी केलीय.
कसं झालं राज्य सहकारी बँकेचं नुकसान?
* संचालक मंडळाने नाबार्डच्या सूचनांचे उल्लंघन केलं
* 9 साखर कारखान्यांना 331 कोटींचा कर्जपुरवठा
* गिरणा, सिंदखेडा कारखाना, सूतगिरण्यांना 60 कोटींचे कर्ज
* केन एग्रो इंडियाची थकहमी रद्द झाल्यानं 119कोटींचा तोटा
* 24 साखर कारखान्यांना विनातारण कर्ज, 225 कोटींची थकबाकी
* 22 कारखान्यांकडील 195 कोटी रूपयांचे कर्ज असुरक्षित
* लघुउद्योगांना दिलेल्या कर्जामुळे सव्वा 3कोटींचे नुकसान
* कर्जवसुलीसाठी मालमत्ता विक्री करूनही 478कोटींची थकबाकी
* खासगी पद्धतीने मालमत्ता विक्री, 37 कोटींचे नुकसान
* 8 थकबाकीदारांच्या मालमत्ता विक्रीत 6.12 कोटींचा तोटा
राज्य सहकारी बँकेतील कोट्यवधी रूपयांच्या आर्थिक तोट्याला तत्कालिन संचालक मंडळ जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. या संचालक मंडळात कोण होते, पाहूयात
* तत्कालिन अध्यक्ष – माणिकराव पाटील
* तत्कालिन उपाध्यक्ष – बाळासाहेब सरनाईक
* संचालक - अजित पवार
* विजयसिंह मोहिते पाटील
* यशवंतराव गडाख
* नितीन पाटील
* अमरसिंह पंडित
* राजवर्धन कदमबांडे
* विजय वडेट्टीवार
* ईश्वरचंद जैन
* दिलीपराव देशमुख
* जे. एन. पाटील
* रामप्रसाद बोर्डीकर
* माणिकराव कोकाटे
* सुरेश देशमुख
* पांडुरंग फुंडकर
* विलासराव जगताप
* रजनी पाटील
* आनंदराव आडसूळ
* दिलीप सोपल
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.