माझी चूक झाली, मला माफ करा - अजित पवार

बेताल वक्तव्य करून दुष्काळग्रस्तांची थट्टा करणा-या अजित पवार यांना मीडियामुळे अखेर नमतं घ्याव लागलं. `झी २४ तास`ने बातमी लावून धरली होती. तर `२४तास डॉट कॉम`ने सर्वप्रथम वृत्त दिले होते. या बातमीच्या दणक्यानंतर चौथ्यांदा अजित पवार यांनी माफी मागितली. माझ्या राजकीय जीवनातील सर्वात मोठी चूक असल्याची कबुली त्यांनी दिली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 8, 2013, 07:12 PM IST

www.24taas.com,मुंबई

बेताल वक्तव्य करून दुष्काळग्रस्तांची थट्टा करणा-या अजित पवार यांना मीडियामुळे अखेर नमतं घ्याव लागलं. `झी २४ तास`ने बातमी लावून धरली होती. तर `२४तास डॉट कॉम`ने सर्वप्रथम वृत्त दिले होते. या बातमीच्या दणक्यानंतर चौथ्यांदा अजित पवार यांनी माफी मागितली. माझ्या राजकीय जीवनातील सर्वात मोठी चूक असल्याची कबुली त्यांनी दिली.
अजित पवार यांच्या वादग्रस्त विधानाबद्दल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि अजितदादांचे काका शरद पवार यांनी जनतेची माफी मागितली. तरीही उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बेताल वक्तव्याचे तीव्र पडसाद विधिमंडळातही उमटलेत. विरोधकांनी आक्रमक होत अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. माफी नको राजीनामाच हवा, अशी ठाम भूमिका घेत विरोधकांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळं विधिमंडळाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं.
अजित पवार चांगलेच अडचणीत आल्याने त्यांनी एकदा नव्हे तर चारवेळा माफी मागितली. तरीही जनता त्यांना माफ करण्यास राजी नसल्याने मीडियासमोर येत त्यांनी चुकीची कबुली दिली. माझ्या राजकीय जीवनातील सर्वात मोठी चूक आहे. मी विनम्रपणे माफी मागतोय, जनतेने मला माफ करावे, असा आर्जव अजित पवार यांनी मीडियासमोर केला.
बेताल वक्तव्य
पाण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण करणा-या प्रभाकर देशमुख यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर येथील कार्यक्रमात जाहीर भाषणात टर उडवली होती. `५५ दिवस उपोषण करूनही पाणी मिळालं का?.. पाणीच नाही तर काय मुतायचं का?`, अशी अशोभनीय भाषा त्यांनी वापरली होती. त्यामुळे विरोधकांसह राज्यातून अजितदादांनी दुष्काळग्रस्तांची माफी मागावी आणि राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली होती.

तापलेले वातावरण पाहून, अजितदादांनी काल संध्याकाळी माफीनामा सादर केला होता. माझ्या वक्तव्यानं जनतेच्या भावना दुखावल्या असतील तर मी अत्यंत विनम्रपणे माफी मागतो, असं त्यांनी पत्रकात म्हटलं होतं. त्यानंतर आज, शरद पवारांनी `ट्विटर`वरून माफी मागून वादावर पडदा टाकायचा प्रयत्न केलाय.
दरम्यान, अजित पवारांनी दोन्ही सभागृहांत माफी मागितल्यानंतरही विरोधकांचा आक्रमकपणा कमी झाला नाही. अखेर विरोधकांनी राजीमान्याची मागणी करत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही घेराव घातला. माफीनामा नको, राजीनामा द्या अशी मागणी विरोधकांनी केली. अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.

घोषणाबाजी आणि आंदोलन

अजित पवारांच्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ मुंबईत भाजप कार्यकर्त्यांनी तर नाशकात शिवसेनेनं जोडेमारो आंदोलन केलं. विधिमंडळाच्या बाहेर भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. भाजप नेत्या शायना एनसी आणि माजी खासदार जयंतीबेन मेहता यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.
नाशिकच्या शालिमार चौकात शिवसैनिकांनी अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. अजित पवारांनी राजीनामा द्यावी अशी मागणीही शिवसैनिकांनी केली.