www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेला चिमटा काढलाय. अजित पवार यांनी पुन्हा सेना-मनसेला अंगावर घेतलेय. मातोश्री, कृष्णकुंजमुळे प्रश्न सुटण्याऐवजी वाढतात, अशी टीका केली.
कै. गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने आयोजित केलेल्या बक्षीस वितरण सोहळ्यात ते बोलत होते. जलसंपदा मंत्री सुनील तटकरे, नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, कार्यवाह दीपक करंजीकर, कोषाध्यक्ष लता नार्वेकर, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रवी सावंत आदी या वेळी उपस्थित होते. नाट्य परिषदेच्या बोधचिन्हाचे याप्रसंगी अनावरण करण्यात आले.
मराठी नाट्य-चित्रसृष्टी दोन गटांत विभागली आहे. फावल्या वेळेत कुणी मातोश्रीवर तर कोणी कृष्णकुंजवर धाव घेतो. कामापुरते वापरून घेणारे पक्ष देशात कमी नाहीत; मात्र केवळ तेथे जाऊन प्रश्न सुटण्याऐवजी वाढण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे योग्य काय ते ज्याचे त्याने ठरवावे, असा सल्ला पवार यांनी काल येथे दिला.
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या अध्यक्षपदासाठी वामन केंद्रे यांच्या नावाची तसेच अभिनेते प्रशांत दामले यांच्या नावाची पद्मश्रीसाठी शिफारस करावी, या सूचना मोहन जोशी यांनी केल्या आहेत. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे तसेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करून त्याबाबत प्रयत्न केले जातील, असे पवार म्हणालेत.
या सोहळ्यात ज्येष्ठ कलावंत मदन गडकरी आणि लीला मेहता यांना नारायण राणे पुरस्कृत तातू सीताराम राणे जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. तर आविष्कारचे अरुण काकडे, नाट्य दिग्दर्शक वामन केंद्रे, अभिनेते प्रशांत दामले यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.