मराठी तरुणाची झेप... 'थ्रस्ट एअरक्राफ्ट'ला मिळाले पंख!

भारतीय बनावटीचे पहिले विमान बनवणाऱ्या कॅप्टन अमोल यादव यांचे विमान निर्मितीचा कारखाना उभा करण्याचे स्वप्न प्रत्यक्ष उतरण्याच्या वाटेवर आहे.

Updated: Mar 31, 2017, 06:57 PM IST
मराठी तरुणाची झेप... 'थ्रस्ट एअरक्राफ्ट'ला मिळाले पंख! title=

दीपक भातुसे, मुंबई : भारतीय बनावटीचे पहिले विमान बनवणाऱ्या कॅप्टन अमोल यादव यांचे विमान निर्मितीचा कारखाना उभा करण्याचे स्वप्न प्रत्यक्ष उतरण्याच्या वाटेवर आहे. अमोल यादव यांना विमान निर्मितीचा कारखाना उभा करण्यासाठी पालघर इथे जमीन देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. ही जमीन यादव यांच्या टीएसी कंपनीला येत्या ३ एप्रिलला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हस्तांतरित करण्यात येणार आहे.

भारतीय बनावटीचे पहिले विमान

६ व २० आसनी विमान निर्मित करण्यासाठी पालघर येथे १५७ एकर जागा दिली जाणार आहे. अमोल यादव यांनी 'मेक इन इंडिया' सप्ताहात आपले विमान सादर केले होते. 'झी मीडिया'ने हे विमान प्रकाशात आणल्यानंतर 'झी मीडिया'च्या वृत्ताची दखल घेऊन शासनाने त्यांना विमान निर्मितीसाठी ही जमीन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एका मराठी तरुणाची वाटचाल आता प्रत्यक्ष विमान निर्मितीच्या दिशेने सुरू झाली आहे.

मंदिराच्या आवारात विमान

कॅप्टन अमोल यादव हा मराठी तरुण जेट एअरवेजमध्ये पायलट म्हणून कार्यरत आहे. पायलट म्हणून विमान उडवणाऱ्या अमोल यादवचे स्वप्न होते स्वतः विमान निर्मिती करण्याचे.. स्वप्न मोठे होते आणि त्यासाठी संघर्षही मोठा होता. पण, हा संघर्ष करण्याची अमोल यादवची तयारी होती. त्यासाठी त्याने तो राहत असलेल्या चारकोप इथल्या इमारतीच्या टेरसवर लहानशा जागेत 5 ते 6 वर्ष झटून पहिले भारतीय बनावटीचे विमान तयार केले. आपले हे संशोधन जगासमोर आणण्याची संधी त्यांना मुंबईत फेब्रुवारी महिन्यात भरलेल्या मेक इन इंडिया सप्ताहात मिळाली. इथे त्यांच्या या विमानाचे कौतुक झाले. मात्र मेक इन इंडिया सप्ताह संपला आणि हे विमान कुठे ठेवायचे? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. मग त्यांनी हे विमान ठेवले चारकोप इथल्या एका मंदिराच्या आवारात...


'मेक इन इंडिया'मध्ये सादर

मदतीचा हात

अमोल यादव याच्या या संघर्षाच्या सगळ्या कहाण्या 'झी मीडिया'ने समोर आणल्या. 'झी मीडिया'ने दाखवलेल्या या वृत्ताची दखल थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि अमोल यादवशी सरकारने संपर्क केला. भारतीय बनावटीच्या विमाननिर्मितीची सुरुवात करण्यासाठी राज्य सरकारने अमोल यादव यांच्या 'थ्रस्ट एअरक्राफ्ट'ला सगळे सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. विमान ठेवण्यासाठी राज्य सरकारने त्यांना धुळे विमानतळावर जागा दिली आहे, तर 19 आसनी विमान निर्मितीचा कारखाना उभारण्यासाठी पालघर इथे जागा देण्याची तयारीही दर्शवली आहे.

'मेक इन इंडिया' सप्ताहानंतर अमोल यादवला हैद्राबाद इथे भरलेल्या सिव्हिल अॅव्हिअशन फेअरचे आमंत्रण आले. इथे खुद्द राष्ट्रपतींनी त्यांच्या या कार्याचे कौतुक केले. एकीकडे राज्य शासनाकडून हे सहकार्य मिळत असताना विमान इंजिन पुरवण्यासाठी जागतिक स्तरावरील आघाडीच्या लंडन येथील रोल्स रॉयस आणि कॅनडा येथील प्रॅटी अॅन्ड व्हिटनी, तर तंत्रज्ञानासाठी जगात पहिल्या नंबरवर असलेल्या अमेरिकेतील 'रॉकवेल कॉलिंग' या कंपनीने करार करण्याची तयारी दर्शवली आहे. जेट एअरवेजमध्ये पायलट असल्याने विमाननिर्मितीचा कारखाना उभा करण्यासाठी अमोल यादव यांच्यासमोर आर्थिक अडचणी मोठ्या आहेत. त्यामुळेच कारखान्याचे डिझाईन प्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ शशी प्रभू यांनी कोणतेही शुल्क न आकारता तयार करून दिले आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अमोल यादव

खऱ्या अर्थानं 'मेक इन इंडिया'

आता शासनाकडून अधिकृतपणे जमीन हातात आल्यानंतर युद्धपातळीवर कारखाना उभारण्याचे काम यादव करणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष विमाननिर्मिती सुरू करून डिसेंबर 2017 पर्यंत भारतीय बनावटेचे पहिले विमानाचे उड्डाण करण्याचे अमोल यादवचे स्वप्न आहे. यात राज्य सरकारचे आणि केंद्र सरकारचे सहकार्य त्यांना गरजेचे आहे. अमोल यादव याचे स्वप्न पूर्ण झाले तर खऱ्या अर्थाने आपल्या देशाची वाटचाल 'मेक इन इंडिया'च्या दिशेने सुरू आहे, असे म्हणावे लागेल.

अमोल यादव या मराठी तरुणाचे विमान निर्मितीचे स्वप्न प्रत्यक्ष उतरल्यानंतर मेक इन इंडिया आणि मेक इन महाराष्ट्र हा सरकारने दिलेला नारा प्रत्यक्षात आल्याचे आपल्याला दिसणार आहे. पण त्यासाठी गरज आहे ती राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने अमोल यादवसारख्या तरुणांना प्रोत्साहन देण्याची आणि सहकार्याची करण्याची...