रावांचा रिक्षा बंदचा डाव फसला, हायकोर्टाची चपराक!

नागरिकांना वेठीस धरून भाडेवाढीसाठी जाहीर केलेला दोन दिवसीय बंद मागे घेण्यात आलाय. २१ ऑगस्ट मध्यरात्रीपासूनच्या संपाचा कामगारनेते शरद राव यांचा डाव मुंबई हायकोर्टानं उधळून लावलाय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Aug 21, 2013, 10:32 AM IST

www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
नागरिकांना वेठीस धरून भाडेवाढीसाठी जाहीर केलेला दोन दिवसीय बंद मागे घेण्यात आलाय. २१ ऑगस्ट मध्यरात्रीपासूनच्या संपाचा कामगारनेते शरद राव यांचा डाव मुंबई हायकोर्टानं उधळून लावलाय. रिक्षा संघटनांनी अशाप्रकारे बंद करू नये, असे आदेश न्यायालयानं दिले. यामुळं सतत संपाची धमकी देणारे राव तोंडावर आपटले आहेत.
मुंबई ग्राहक पंचायतीनं दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाल्यानंतर शरद राव यांच्या युनियननं संप स्थगित करण्याची घोषणा केली. कोर्टाच्या आदेशानुसार रिक्षाचालकांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात येणार असून, त्यातून मार्ग निघेल, असा आशावाद राव यांनी व्यक्त केलाय. या चर्चेतून काहीही साध्य न झाल्यास नव्यानं भूमिका घेतली जाईल, असंही ते म्हणाले.
दरम्यान, राव यांच्या बंदला मुंबईतल्या इतर सात ऑटोरिक्षासंघटनांनी पाठिंबा न देण्याचं याआधीच ठरवंल होतं. त्याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली होती.
राज्य सरकारच्यावतीनं बंद पुकारणाऱ्या रिक्षा संघटनांवर "मेस्मा`अंतर्गत कारवाई करण्याची तयारी केली. तसंच संपकाळात नागरिकांचे हाल होऊ नयेत म्हणून सर्व यंत्रणांना पर्यायी उपाय करण्याचे निर्देशही दिले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.