नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये महापालिकेची रुग्णालयं आहेत पण तिथे डॉक्टर नाहीत, अशी विचित्र स्थिती आहे. पालिकेचं ऐरोलीमधलं राजमाता जिजाऊ माता-बाल रुग्णालय त्यापैंकीच एक...
ऐरोलीत १५० खाटांचं प्रशस्त पाच मजली राजमाता जिजाऊ माताबाल रुग्णालय बांधून तयार आहे. पण तिथे डॉक्टर आणि विशेष करुन स्त्री-रोग तज्ज्ञ नसल्यानं, या रुग्णालयात बाळंतपण केलं जात नाही.
या ठिकाणी फक्त ओपीडीच सुरु असल्यानं गर्भवतीला प्रसुतीसाठी या रुग्णालयातून वाशीतल्या प्रथम संदर्भ रुग्णालयात नेलं जातं. तिथे जागा रिकामी नसेल तर मात्र कळवा रुग्णालय किंवा मुंबईतल्या रुग्णालयाचा नाईलाजानं रस्ता धरावा लागतो.
ऐरोलीत महिन्याला सरासरी दिडशे महिलांची प्रसूती होते. मात्र, रुग्णालयात डॉक्टर नसल्यामुळे गर्भवतींना असा मुकाट त्रास सहन करावा लागतोय.
सध्या नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे आणि कोपरखैरणे इथल्या माता-बाल रुग्णालयांची बांधकामं सुरु असल्यानं, इथे येणाऱ्या गर्भवतींनाही वाशीतल्याच संदर्भ रुग्णालयात पाठवलं जातं.
दरम्यान पालिका आणि सरकारी रुग्णालयांत डॉक्टरांची कमतरता असून, भरती प्रक्रिया सुरु असल्याचं नवी मुंबई पालिका आयुक्तांनी सांगितलंय.