शरद पवार, शिंदे बेकार माणसे – बाळासाहेब ठाकरे

जय महाराष्ट्र...जमलेल्या माझ्या मराठी बांधवांनो, मातांनो आणि भगिनींनो अशा आपल्या चिरपरिचित आवाजात साद घालतच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांशी चित्रफितीद्वारे दसरा मेळाव्याचा संवाद साधला. मात्र, यावेळी केंद्रातील माझे मित्र सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवार दिल्लीत आहेत, पण ही सगळी बेकार माणसे आहेत, अशी बोचरी टीका ठाकरे यांनी केली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 25, 2012, 10:42 AM IST

www.24taas.com,मुंबई
जय महाराष्ट्र...जमलेल्या माझ्या मराठी बांधवांनो, मातांनो आणि भगिनींनो अशा आपल्या चिरपरिचित आवाजात साद घालतच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांशी चित्रफितीद्वारे दसरा मेळाव्याचा संवाद साधला. मात्र, यावेळी केंद्रातील माझे मित्र सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवार दिल्लीत आहेत, पण ही सगळी बेकार माणसे आहेत, अशी बोचरी टीका ठाकरे यांनी केली.
यावेळी बाळासाहेबांनी काँग्रेसवर हल्ला चढवला. चणेफुटाणेवाला कृपाशंकर मुंबईचा बादशहा व्हायला निघाला होता. बेनामी संपत्तीच्या प्रकरणात अडकलाय. माझी तर शिवचरणी प्रार्थना आहे, वढेरा प्रकरणाचे काहीही होवो, वढेरा मात्र संपू दे. हे संपूर्ण गांधी घराणेच संपले पाहिजे. तर बांगलादेशी घुसखोरांना ठेचायलाच हवे. आसाममध्ये सैन्य घुसवा. बऱ्या बोलाने ऐकले तर ठिक. नाहीतर सरळ गोळ्या घाला त्या घुसखोरांना, अशा ठाकरी शब्दात समाचार घेतला.
शिवसैनिकहो, तुमचं हृदय माझ्यापाशी आणि माझं हृदय तुमच्यापाशी... असे भावस्पर्शी उद्गार ठाकरे यांनी काढले, तेव्हा ऐतिहासिक शिवतीर्थही गहिवरून गेले. जमलेला अफाट जनसागर नि:शब्द झाला... शिवसैनिकांच्या काळजाला थेट हात घालीत शिवसेनाप्रमुख पुढे म्हणाले, मराठी माणसांना माझं एकच सांगणं आहे. एकत्र राहा, इमान कायम ठेवा, मग शिवसेनेला कुणीही हटवू शकणार नाही. जसं मला सांभाळलंत तसंच उद्धवला आणि आदित्यला सांभाळा.
शिवसेनाप्रमुख म्हणाले, ‘मराठी सोडणार नाही, कदापि सोडणार नाही. हा तर शिवसेनेचा पाया आहे. शेवटी कसंही बोललात तरी काहीजण बोंबलतातच. मराठी घेतलं तर हिंदुत्वाचं काय झालं, हिंदुत्वावर बोललो तर मराठीचं काय झालं. पण मी पर्वा करत नाही. स्वीकारायचे तर स्वीकारा नाहीतर द्या फेकून. शिवसेनाप्रमुखांच्या या तडाख्याने टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. पुढच्याच क्षणी शिवसेनाप्रमुख हळवे झाले आणि शिवतीर्थ गहिवरले. गर्दीचा महासागर नि:शब्द झाला.
क्लीन चिटही भरपूर झाल्यात. इतक्या की आपला देश ‘नेशन ऑफ चीटर’ झालाय. मराठी माणसाने एकत्र येऊन एकजूट दाखवून काँग्रेसच्या कानफटीत मारलीच पाहिजे. निदान मराठी माणसाने तरी शिवसेनेच्या विरोधात उभे राहता कामा नये. आई जगदंबेने शक्ती दिली, ताकद दिली तर पुढच्या वर्षी दसरा मेळाव्याला नक्की येईन, असा विश्वास शिवसैनिकांना दिला.