मुंबई: अखेर बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागा सापडल्याचं दिसतंय. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक दादरच्या वीर सावरकर मार्गावर मोक्याच्या ठिकाणी असलेल्या क्रीडा भवनाच्या जागेवर उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. मुंबई महापालिकेचं हे क्रीडा भवन नादुरूस्त असल्याचं कारण देत दोनच दिवसांपूर्वी बंद करण्यात आलंय.
23 जानेवारीला बाळासाहेबांची जयंती आहे, त्यादिवशी यासंदर्भातली घोषणा होण्याची शक्यता आहे. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी 3 ते 4 जागांचा विचार सुरू आहे. त्यामध्ये या जागेचा समावेश असल्याचं कळतंय.
महापालिकेच्या क्रीडा भवनचा हा भूखंड ३१०८ चौ.मी. क्षेत्रफळाचा असून, प्रत्यक्ष वापराकरिता २७७९.८५ चौ.मी. भूखंड उपलब्ध होऊ शकतो. या ठिकाणी ६१० चौ.मी. क्षेत्रावर टेनिस कोर्ट होते. याखेरीज बॅडमिंटन, कॅरम, पत्ते खेळण्याची सोय होती. शिवाजी पार्क परिसरातील काही मंडळी आणि विशेषकरून मध्यमवर्गीय कुटुंबातील क्रीडापटू या क्रीडा भवनचा वापर करीत होते. दोन दिवसांपूर्वी दुरुस्तीकरिता ही वास्तू अचानक बंद केली. प्रत्यक्षात या ठिकाणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांचे स्मारक उभारण्याचा प्रस्ताव असल्याची चर्चा सुरू आहे.
याबाबत शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांना विचारले असता ते म्हणाले, की क्रीडा भवनच्या जागेवर शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभे करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. मात्र अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. बाळासाहेबांच्या स्मारकाकरिता ३ ते ४ जागांचा विचार सुरू आहे. त्यामध्ये या जागेचा समावेश निश्चित आहे. शिवाजी पार्क परिसरात क्रीडा भवनच्या जागेखेरीज दुसरी जागा उपलब्ध आहे का, असं विचारलं असता या परिसरात दुसरी जागा नाही, असं शेवाळे यांनी स्पष्ट केलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.