मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक महापौर बंगल्यात होईल, अशी घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. महापौर बंगल्यामध्ये पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. यावेळी उद्धव ठाकरेही उपस्थित होते. युती सरकारच्या कार्यकाळातच हे स्मारक पूर्ण होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
बाळासाहेब ठाकरे यांचं मुंबईत स्मारक व्हावं अशी मागणी गेल्या तीन वर्षांपासून होत होती. गेल्या वर्षी बाळासाहेब ठाकरे यांच्या व्दितीय स्मृतीदिनी राज्य सरकारनं स्मारकासाठी उच्चस्तरीय समिती नेमली होती. या समितीनं मुंबई आणि परिसरातील आठ जागांची पाहणी केली. आज बाळासाहेबांच्या तृतीय स्मृतीदिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत स्मारकाबाबत घोषणा केली.
आणखी वाचा - शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाची जागा निश्चित, पंतप्रधानांनीही वाहिली आदरांजली
स्मारकाच्या कामात निधीचा प्रश्न येणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. स्मारकासाठी पब्लिक ट्रस्टची निर्मिती केली जाईल. या ट्रस्टच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे असतील आणि ट्रस्टच्या देखरेखीखाली स्मारकाचं काम केलं जाईल, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. महापौरांसाठी अन्यत्र निवासस्थान उपलब्ध करुन दिलं जाईल असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
स्मारकासाठी जागा उपलब्ध करुन दिल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांचे आभार मानले. महापौर बंगल्याचा शिवसेनेवर आशिर्वाद होता, तर शिवाजी पार्क ही शिवसेनेची कर्मभूमी आहे. त्यामुळं महापौर बंगल्याच्या जागेला विशेष महत्त्व आहे असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. महापौर बंगला ही हेरिटेज इमारत असल्यानं बंगल्याला धक्का न लावता स्मारक उभारलं जाईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आणखी वाचा - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आज तिसरा स्मृतिदिन, स्मारकाच्या घोषणेची शक्यता
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.