मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीच्या वादावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून जयदेव ठाकरे यांची साक्ष नोंदवण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरे हे आपल्याला त्यांचा राजकीय वारसदार समजायचे, असा दावा जयदेव यांनी आपल्या साक्षीत केला आहे.
शिवसेनाप्रमुख यांच्या इच्छापत्रावरून उद्धव आणि जयदेव या भावांमधील वाद उच्च न्यायालयात पोहोचलाय. बाळासाहेबांच्या आजारपणाचा फायदा उठवत उद्धव यांनी त्यांची सगळी मालमत्ता बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत जयदेव यांनी इच्छापत्राला न्यायालयात आव्हान दिले आहे.
या प्रकरणाच्या सुनावणीचा मंगळवारी दुसरा दिवस होता. उलटतपासणीच्या दुसऱ्या दिवशी जयदेव यांनी मुंबई उच्च न्यायालयासमोर ही माहिती दिली. बाळासाहेब त्यांचा राजकीय वारसदार म्हणून माझ्याकडे पाहत होते पण त्यांच्या विचारांशी माझे विचार मिळते जुळते नव्हते त्यामुळे मी राजकारणात फारसे स्वारस्य दाखवले नाही, अशी नवी माहिती त्यांनी न्यायालयासमोर दिली.
सुरुवातीच्या काळात मी बाळासाहेबांसोबत होतो त्यावेळी बिंदूमाधव आणि उद्धव हे दोघेही आपापल्या कामात व्यग्र असायचे, त्यामुळे शिवसेनेत मी सक्रीय व्हावे आणि त्यांचा राजकीय वारसा पुढे चालवावा, अशी इच्छा देखील त्यांनी बोलून दाखवली होती, असेही जयदेव यांनी सांगितले.