सावधान, तुम्ही कुरिअरमधून चेक पाठवत असाल तर!

अनेकवेळा आपण एखादी वस्तू किंवा कागदपत्रे पाठविण्यासाठी कुरिअरचा उपयोग करतो. मात्र, कधी कधी हा वापर आपल्याला महागात पडू शकतो. अलिकडेच कुरिअरमधील चेक चोरून ते वटवल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. अशी एक टोळीच मुंबई आणि परिसरात कार्यरत असल्याचे उघड झालेय.

Updated: Aug 27, 2014, 03:01 PM IST
सावधान, तुम्ही कुरिअरमधून चेक पाठवत असाल तर! title=

मुंबई : अनेकवेळा आपण एखादी वस्तू किंवा कागदपत्रे पाठविण्यासाठी कुरिअरचा उपयोग करतो. मात्र, कधी कधी हा वापर आपल्याला महागात पडू शकतो. अलिकडेच कुरिअरमधील चेक चोरून ते वटवल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. अशी एक टोळीच मुंबई आणि परिसरात कार्यरत असल्याचे उघड झालेय.

कुरिअरच्या माध्यमातून आलेले चेक चोरून बनावट बँक खात्यात लाखो रुपये जमा करणाऱ्या एका टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केली. ५ जणांच्या टोळीला माटुंगा पोलिसांनी पकडले. या टोळीकडून पोलिसांनी साडेपाच लाख रुपये रोख आणि करोडो रुपयांचे चेक देखील जप्त केले आहेत.

मुलुंड येथील प्रशांत पटेल यांचा रंग विकण्याच्या व्यवसाय आहे. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी खोपोलीतील भूषण स्टील या कंपनीला माल पाठवला होता. त्यानुसार कंपनीने त्यांना २२ लाखांचा चेक कुरिअरच्या माध्यमातून पाठवला. मात्र, कंपनीने चेक पाठवून महिना उलटला असताना त्यांना चेक न मिळाल्याने त्यांनी याबाबत कंपनीकडे अधिक चौकशी केली. यामध्ये त्यांचा चेक खात्यात वटल्याचे दाखवण्यात आले. 

चेक वटल्याचे खात्री बॅंकेत केली असता दुसरेच वास्तव पुढे आले. त्यांचा चेक मुलुंडमधील खात्यात जमाच झालेला नाही. तो माटुंग्याच्या एका बँकेत जमा झाल्याचे त्यांना समजले. आपला चेक कोणीतरी चोरुन वटवल्याचे लक्षात येताच पटेल यांनी माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर कुरिअरमधील हे सत्य उघड झाले.

पोलिसांनी बँकेत जाऊन ज्या खात्यात चेक वटवण्यात आला त्याचा शोध घेतला. मात्र, यामध्ये सर्व कागदपत्र बनावट असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी खबर्‍याच्या मार्फत नवी मुंबई येथून सुनील कुवार (२७), रघुत्तम नामण्णा (२५) यांना ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता मुख्य सूत्रधार लक्ष्मण जोगळेकर (४२) याचे नाव समोर आले. या टोळीचे खरे रुप त्यानंतर उघड झाले.

बीकॉम पास असलेल्या लक्ष्मणची काही वर्षांपूर्वी कुरिअर कंपनी होती. त्यामुळे त्याला कुरिअरबाबत सर्व काही माहीती होती. अनेक कंपन्या कुरिअरच्या माध्यमातून चेक पाठवत असल्याने हेच चेक चोरुन ते वटवण्याची कल्पना त्याने आखली. यासाठी त्याने एक प्लेसमेंट एजन्सी सुरु केली. नोकरीसाठी येणार्‍या मुलांच्या नावाने तो बनावट खाती उघडून चेक वटवित होता. त्याच्याकडेच काम करणार्‍या रोहित गायकवाड (२३) या तरुणाला त्याने ओळखीवरुन एका मोठय़ा कुरिअर कंपनीत कामाला लावले. हा तरुण कुरिअरसाठी आलेले चेक आरोपीकडे आणून द्यायचा. त्यानंतर लक्ष्मण मंजूनाथ घोडके (२३) याच्या मदतीने त्या चेकवर असणार्‍या कंपनीच्या नावाने बनावट खाते उघडून ते चेक वटवायचा. अतापर्यंत करोडो रुपयांचे चेक वटवलेत. 

या टोळीकडून पोलिसांनी १८९ विविध कंपन्याचे चोरलेले चेक, बनावट पॅनकार्ड, एटीएम कार्ड, १६ मोबाईल फोन आणि साडेपाच लाख रुपये रोख असा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच यामध्ये आणखी काही आरोपींचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.