मुंबई : महायुतीच्या जागावाटपाचा वाद टोकाला गेला असताना शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपची ताकद वाढलेली नसल्याचा दावा 'झी २४ तास'च्या 'रोखठोक' या खास कार्यक्रमात केलाय.
भाजप नेते विनोद तावडे यांची क्षमता अधिक असून त्यांच्याकडे गृहमंत्रिपदासह आणि आठ मंत्रिपदं सोपवायला हवीत, असा टोला कदम यांनी या कार्यक्रमात लगावला. तावडे यांनी आमचीच सत्ता येणार आहे. मीच गृहमंत्री होणार आहे. मग्रुमी पोलीस अधिकाऱ्याला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तरुंगात डांबू, असा जाहीर इशारा तावडे यांनी दिला होता. यावर हा टोला कदम यांनी लगावलाय.
शिवसेना भाजपमधील जागावाटपाबाबत तणाव शिगेला पोहचला असताना अखेर भाजपाने काहीसं नरमाईचं धोरण स्वीकारलंय. शिवसेनेबरोबरची युती कायम ठेवायचीय असं भाजपनं अखेर स्पष्ट केलंय. भाजपाच्या 288 जागांमधील वाटपाबाबतच्या अपेक्षा भाजपचे निवडणूक प्रभारी ओम माथुर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसमोर ठेवल्यात.
नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या भाजप कोरकमिटीच्या बैठकीनंतर सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली.. आर की पार अशी भूमिका याआधी घेणा-या भाजपनं बैठकीनंतर एक पाऊल मागे घेतल्याचं दिसून येतंय.. उमेदवार निवडून येण्याच्या क्षमतेवरच जागावाटप व्हावे असा आग्रह मात्र भाजपनं धरला असून त्याबाबतचं मतही सेनेसमोर मांडल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं.
तसंच गेल्या निवडणूकीत 119 जागा भाजपनं लढवल्या होत्या. तेव्हा या 119 जागांवरील उमेदवारांची यादी कोअर कमिटीनं नितीन गडकरींशी चर्चा करुन निश्चित केलीय. या 119 उमेदवारांच्या यादीबाबत भाजपची केंद्रीय संसदीय समिती लवकरच निर्णय घेणार असल्याचंही मुनगंटीवार यांनी बैठकीनंतर सांगितलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.