मुंबईच्या अपूर्ण रस्त्यांवरून भाजप-शिवसेना आमनेसामने...

पावसाळा पंधरा दिवसांवर आलेला असतानाही मुंबई महापालिकेने हाती घेतलेली रस्त्यांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. काम सुरु केलेल्या 558 रस्त्यांपैकी अजून 312 रस्त्यांची कामे अपुर्णावस्थेत आहेत. यावरून आता चांगलंच राजकारण रंगलं असून शिवसेना आणि भाजप आमनेसामने आली आहे. 

Updated: May 19, 2017, 10:42 PM IST
मुंबईच्या अपूर्ण रस्त्यांवरून भाजप-शिवसेना आमनेसामने... title=

कृष्णात पाटील, झी मिडिया मुंबई  : पावसाळा पंधरा दिवसांवर आलेला असतानाही मुंबई महापालिकेने हाती घेतलेली रस्त्यांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. काम सुरु केलेल्या 558 रस्त्यांपैकी अजून 312 रस्त्यांची कामे अपुर्णावस्थेत आहेत. यावरून आता चांगलंच राजकारण रंगलं असून शिवसेना आणि भाजप आमनेसामने आली आहे. 
 
 पावसाळा तोंडावर आला असला तरी मुंबईत असे खोदलेले रस्ते ब-याच ठिकाणी अजून पाहायला मिळतायत. ठाणे जिल्हयातील दगडखाणी बंद झाल्याने रस्ते कामासाठी लागणारी खडीचा तुटवडा मधल्या काळात निर्माण झाल्याने रस्त्याची काम रखडली होती. अखेर प्रशासनाने यावर मार्ग काढत खडीचा प्रश्न सोडवला असून उर्वरीत रस्ते कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरु झाली आहे. 
 
 31 मेपर्यंत कुठल्याही परिस्थितीत रस्ते पूर्ण करण्याच्या नावाखाली कंत्राटदारांनी कामाचा वेग वाढवला असला तरी यामुळं रस्त्यांच्या दर्जाबाबत मात्र तडजोड होताना दिसतंय. त्यामुळं नवे रस्ते पहिल्याच पावसात उखडण्याची शक्यता अधिक आहे. अद्याप 312 रस्त्यांची कामे अपूर्णावस्थेत असल्यानं भाजपनं शिवसेनेला टार्गेट करण्यास सुरुवात केलीय. पावसाळ्यात मुंबईकरांना खड्ड्यातून प्रवास करावा लागल्यास त्याला 'करून दाखवले' म्हणणारे जबाबदार असतील, असा इशारा भाजपनं दिलाय.

 31 मेपर्यंत सर्व रस्त्यांची कामे पूर्ण होण्याबरोबरच रस्त्यांवरील सर्व खड्डे भरले जातील असा विश्वास सत्ताधारी शिवसेनेने व्यक्त केला आहे. तसंच  आतापर्यंत सोबत असलेली भाजप आता मात्र राजकीय भाषा बोलत असून भाजप म्हणजे मूंह मै राम, बगलमै छुरी असल्याचे प्रत्युत्तर सेनेनं दिलं.

सत्तेतून पहारेकरांच्या भूमिकेत आलेली भाजप आता विरोधकांचीही जागा भरून काढत आहे. त्यामुळं शिवसेनेला विरोधकांपेक्षा भाजपचाच अधिक सामना करावा लागत आहे.