मुंबई : भाजप आणि शिवसेनेमधलं शाब्दिक युद्ध आता रंगू लागले आहे. भाजपने आपल्या मुखपत्र मनोगतमधून शिवसेनेला सत्तेतून बाहेर कधी पडताय असा सवाल विचारलाय.
भाजपचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल करताना कधी काडीमोड घेताय असा थेट सवाल विचारलाय. तुमची सरकारवर नाराजी असल्यास सत्तेतून बाहेर पडा, असा थेट इशाराच दिलाय. राज्यात शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाकयुद्ध आता धमकीयुद्ध बनलंय. भाजपनं आपल्या मुखपत्र मनोगतमधून शिवसेनेला खडे बोल सुनावलेत.
निजामानं दिलेल्या एका हातानं ते बिर्याणी खातायत आणि त्यांच्यावरच पुन्हा टीका करतात. केंद्र सरकारमध्ये त्यांचे मंत्रीही आहेत आणि सगळ्या सोयीसुविधांचा आनंद घेतायत. हे सगळं त्याच निजामामुळं आहे आणि तरीही ते भाजपला शिव्या घालत आहेत. इतकीच नाराजी असेल तर सरकारमधून बाहेर पडण्याची हिंमत दाखवा. आमच्याच सरकारमध्ये आहात आणि आम्हालाच शिव्यांची लाखोली वाहत आहेत. तर सांगा राऊतसाहेब कधी काडीमोड घेत आहेत.
भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांच्या लेखात शिवसेनेची तुलना शोलेमधील कॉमेडी अभिनेता असरानीशी करण्यात आली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका कार्यक्रमात जाहीररित्या भाजपची तुलना निजामाशी केली होती. मुखपत्र सामनामधून शिवसेना भाजप आणि पंतप्रधान मोदींवरही जोरदार टीका करत असते. आगामी पालिका निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी तयार रहा,असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिन सोहळ्यात शिवसैनिकांना केले होते. यावेळी त्यांनी भाजप आणि मोदींनाही टार्गेट केलं होते. शिवसेना आणि भाजपमधील या वाकयुद्धाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनाही टीकेची आयती संधी मिळाली आहे.
शिवसेनेकडून होणारे शाब्दिक हल्ले आजवर भाजपनं सहन केलेत.मात्र आता भाजपनंही शिवसेनेवर टीकेचे बाण सोडण्यास सुरुवात केली आहे. आगामी मुंबई पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षातलं हे युद्ध आणखी पेटण्याची शक्यता आहे.
भाजपकडून करण्यात आलेली टीका शिवसेनेच्या जिव्हारी लागली असून, शुक्रवारी मुंबईतील शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी या टीकेच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची तुलना ‘शोले’मधीलच गब्बर सिंह या खलनायकाशी केली. वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अमित शहा गब्बर सिंहच्या भूमिकेत पक्के बसतात. त्यांचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला. तर ते त्या भूमिकेला शोभतात, असे पेडणेकर यांनी म्हटले आहे.
भाजपचे पाक्षिक ‘मनोगत’मध्ये शिवसेनेवर टीका करणारा लेख लिहिणारे भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्यावरही पेडणेकर यांनी टीका केली. माधव भंडारींची तुलना ‘हलचल’ चित्रपटातील राजपाल यादवने साकारलेल्या भूमिकेशी केली आहे. या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेमध्ये राजपाल यादवला सारखे झटके येत असतात. त्याप्रमाणेच माधव भंडारी यांना झटके येतात का, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.