www.24tass.com , झी मीडिया, मुंबई
मुंबईत बाप्पाच्या स्वागताची तयारी जोरात सुरू झालेली आहे. सगळ्यांचा लाडका ‘लालबागचा राजा’ गणेशोत्सव मंडळाला राजाच्या मंडपासाठीची परवानगी महापालिकेनं दिलीय. गेल्या वर्षीचे खड्डे न बुजविल्यामुळं आधी मागील वर्षीचा १९ लाखांचा दंड भरा, तेव्हाच मंडपासाठी परवानगी देऊ असा पवित्रा महापालिकेनं घेतला होता. मात्र दंडाची रक्कम प्रॉपर्टी टॅक्समधून वसूल केली जाईल, अशी भूमिका घेत आता मंडपासाठीची परवानगी महापालिकेनं दिलीय.
लालबागचा राजा मंडळानं गणेशोत्सवासाठी मागील वर्षी ९५६ खड्डे खणले होते. ते बुजविले नाही म्हणून १९ लाख रुपयांचा दंड मंडळाला ठोठावला. यंदा मंडळानं महापालिकेकडे मंडपासाठी परवानगी मागितली, तेव्हा आधीची दंडाची रक्कम भरा, तरच परवानगी दिली जाईल, असं कळवलं. मात्र अतिरिक्त आयुक्त मोहन अडताणी यांनी मंडळाला नोटीस पाठविली असल्याचं मान्य करत मंडळाच्या मालमत्तांच्या प्रॉपर्टी टॅक्समधून दंडाची रक्कम वसूल केली जाणार असल्याचं स्पष्ट केलं.
`गणेशगल्ली`लाही सभामंडपासाठी खणलेले खड्डे न बुजविल्याबद्दल लालबागच्या गणेशगल्ली गणेशोत्सव मंडळालाही बीएमसीनं अडीच लाख रुपये दंड ठोठावला आहे. मात्र हे खड्डे आपण केले नसल्याचा दावा करत दंडात्मक कारवाईची नोटीस मंडळाला अमान्य असल्याचं `गणेशगल्ली` मंडळानं म्हटलंय. शिवाय महापालिका मंडळाला सहकार्य करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.