मुंबई : भाजपशी यापुढं अजिबात युती करणार नाही, असा पुनरूच्चार शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज केला. मात्र मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपची मदत घेण्याचे संकेतही त्यांनी 'झी 24 तास'वरील रणसंग्राम कार्यक्रमात बोलताना दिले.
सरकार 5 वर्ष टिकेल या भ्रमात कुणी राहू नये, असा इशारा देत राऊतांनी मध्यावधी निवडणुकांचे संकेतही दिले.
मुंबई महापालिकेच्या महापौर निवडीत कोणाला वाटत असेल की महापौर शिवसेनेचा व्हावा, त्यांनी मराठी माणसाच्या हितासाठी हात पुढे करावा. त्यांनी असा हात पुढे केला तर आम्ही नाही म्हणणार नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले.
राज्यातील सध्याची स्थिती पाहता राज्यात अस्थिरतेचे वातावरण आहे आणि राज्य मध्यावती निवडणुकीच्या दिशेने वाटचाल होत असे संकेत सामनाचे संपादक खासदार संजय राऊत यांनी झी २४ तासशी बोलताना दिले.
झी २४ तासला दिलेल्या खास मुलाखतीत संजय राऊत यांनी विविध प्रश्नांवर रोखठोक उत्तरं दिलीत. यात राज्य सरकार अस्थीर आहे का असे विचारले असता ते म्हणाले, सध्या राज्यात अस्थीर वातावरण आहे. त्यामुळे काय होईल हे सांगता येत नाही. कोणाला असे वाटेल आमच्याकडे राज्यपाल आहे, राष्ट्रपती आहे म्हणून सरकार कोणी पाडू शकत नाही. तर या भ्रमात कोणी राहू नये, अजूनही सरकार नोटीस पीरिअडवर आहे. त्यामुळे मध्यावधी निवडणुका होऊ शकतात.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या संकेतानंतर संजय राऊत यांनी हे संकेत दिले आहे.