मुंबई : ही गोष्ट आहे मुंबई महापालिकेच्या एका 'अजब शौचालया'ची. मुंबई हागणदारीमुक्त करण्यासाठी म्हणजेच केवळ कागदावर दाखविण्यासाठी पालिका अधिका-यांनी जी काही शक्कल लढवली आहे, त्याला सलामच करायला हवा.
मलबार हिलमध्ये मुंबई महापालिकेचे सार्वजनिक शौचालय एका टॉवरच्या बांधकामासाठी पाडण्यात आले. पुनर्विकासात विकासकानं सार्वजनिक शौचालय बांधले, परंतु ते एका सुपर बझारच्या आतमध्ये बांधले. धक्कादायक म्हणजे पालिका अधिका-य़ांनी ते ताब्यातही घेतले.
आता मुंबई हागणदारीमुक्त करण्याचा दबाव स्थानिक पालिका अधिका-यांवर येवू लागल्यानंतर मग या अधिका-यांनी सुपर बझारच्या आत सार्वजनिक शौचालय असल्याचे बोर्ड बाहेर लावले आणि लोकांना याचा वापर करण्याचे आवाहन केले.
परंतु आतील हे शौचालय बंद तर आहेच शिवाय सुपर बझारवालेही शौचालयासाठी लोकांना आत जाऊ देत नाहीत. या परिसरात एकही सार्वजनिक शौचालय नसल्यानं लोकांची कुचंबणा होत असतानाही पालिका अधिकारी मात्र तिकडं फिरकतच नसल्याची तक्रार स्थानिक करत आहेत.