मुंबई : एका ब्रिटिश रॉक बॅन्डचा 'कोल्डप्ले' ही कॉन्सर्ट रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिलाय.
न्यायालयाच्या निर्णयानंतर आता 'कोल्डप्ले' हा कार्यक्रम १९ नोव्हेंबर रोजी बीकेसी मैदानात होणार आहे.
या कार्यक्रमाच्या आयोजकांनी करमणूक कर द्यावा ही याचिकार्त्यांची मागणी आहे. त्यानुसार याचिकाकर्त्यांच्या बाजूने निकाल लागला तर 'कोल्डे प्ले' आयोजक करमणूक कर भरतील, असं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने आयोजकांकडून लिहून घ्यावे असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकरला दिलेत.
राज्य सरकार आणि संयुक्त राष्ट्र यांच्या वेगवेगळ्या सामाजिक विषयांकरता हा कार्यक्रम आयोजित केलाय, हा दावा कोर्टाने मान्य केलाय. आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम हा तब्बल आठ तासांचा आहे... आणि कोल्डप्लेची कॉन्सर्ट हा त्याचाच एक भाग आहे. हा कार्यक्रम मुख्यत: स्त्री-पुरुष समानता, शिक्षण आणि स्वच्छ पाणी या विषयांवर तरुणांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आलाय, असं राज्य सरकारचं म्हणणं आहे.
या कोल्ड प्ले कार्यक्रमाच्या ११ हजार तिकिटांची विक्री होणार असून, ६० हजार तिकीट मोफत (complimentary) तिकीटं असल्याचं राज्य सरकारचं म्हणणं न्यायालयाने मान्य केलंय.
आमचा कार्यक्रमाला विरोध नाही, आमचा या कार्यक्रमाला करमणूक करातून जी सूट दिली आहे त्याला विरोध आहे असं याचिकाकर्त्यांतर्फे न्यायालयात मागणी करण्यात आलीय.